विकलेल्या, चालवायला दिलेल्या कारखान्याची यादी पवारांकडून जाहीर


पुणे  

गेल्या पंधरा वर्षात ६५ सहकारी साखर कारखाने विकले किंवा चालवायला दिले. त्यातील काही कारखाने फडणवीस सरकारच्या काळातदेखील विकण्यात आलेत. दोन-चार कोटी रूपयांदेखील कारखान्यांची विक्री झाली आहे. या साऱ्या कारखान्यांची यादी मी तुम्हाला दिलीय. कारखाने कुणी-कुणी घेतले त्याचा शोध आता तुम्हीच घ्या, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

जरेंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची विक्री ही पूर्णपणे कायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य बँकेने त्या कारखान्याची विक्री केली आहे. यात कोणताही घोटाळा किंवा नियमबाह्य काहीही झालेले नाही. केवळ बदनामी करण्यात येत आहे, असे पवार यांनी स्पष्ट कले.

पवार यांनी पत्रकार परिषदेत ६५ कारखान्यांची यादीच वाचून दाखवत कोणता कारखाना किती रकमेला विकला गेला ती आकडेवारी वाचून दाखविली. जरंडेश्‍वरच्या व्यवहारात कोणताही गैरप्रकार झाला नाही. सारेकाही नियमानुसार झाले असताना केवळ बदनामी करण्यात येत आहे. सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

६५ कारखान्यांची यादी वाचून दाखवताना त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही. ज्या कंपनीने संबंधित कारखाना विकत घेतला त्या कंपनीची नावे वाचून दाखविली या कंपन्यांच्या नावावरून तुम्हाला मालकांचा शोध लागेल, असे त्यांनी सांगितले. ज्यांनी आरोप करून बदनामी केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. त्यांच्याविरोधात न्यायालयातही जाणार नाही. असले उद्योग मी करीत नाही. मला भरपूर कामे आहेत, असे सांगत पवार यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांचा नामोल्लेख टाळला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या