मॉन्सूनच्या परतीचा प्रवास यंदा उशिरा .






 पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मंगळवारी (ता. २०) वायव्य भारतातील नैर्ऋत्य राजस्थानच्या काही भागातून तसेच लगतच्या कच्छमधून परतल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास यंदा उशिरा सुरू झाला आहे.

साधारणपणे मॉन्सूनच्या परतीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख ही १७ सप्टेंबर आहे. मात्र यंदा तीन दिवस उशिराने मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. हवामानशास्त्र विभागाने या आधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून माघारी फिरण्याचा अंदाज दिला होता. परंतु वायव्य भारतात पावसासाठी हवामान पोषक असल्याने परतीचा प्रवास काहीसा लांबला.

वायव्य भारतात केंद्रभागी हवेचा अधिक दाब असलेली, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाहेर हवा फेकणारी प्रणाली तयार झाली आहे. वातावरणातील आर्द्रता खूप कमी झाल्याने या भागात पाच दिवासांपासून कोरडे हवामान आहे. यावरून वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

साधारणपणे ५ दिवस पावसाची स्थिती नसणे, कोरड्या हवामानाची स्थिती अश्या विविध हवामानाच्या परिस्थितीच्या आधारावर मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक ठरतात. मॉन्सून साधारणपणे १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून परततो. मात्र गेल्या वर्षी मॉन्सून २५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून बाहेर पडला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या