Shrigonda : श्रेय घेणा-या आमदार पाचपुतेंनी आता प्रायश्चित्त घ्यावं – घनःशाम शेलार

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – मागील रब्बी आवर्तनाच्या वेळी तालुक्यात कुकडी कालव्याचे पाणी भरपूर मिळाले त्याचे श्रेय आमदार पाचपुते यांनी घेतले. आता उन्हाळी आवर्तनात तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार बबनराव पाचपुते यांना दिले आहे.

कुकडी कालव्याचे रब्बीचे आवर्तन दि. १ जानेवारी २० रोजी सुटले त्यावेळी शेतक-यांना पाण्याची फारशी आवश्यकता नसल्याने तालुक्यातील सर्व तलावात पाणी सोडण्यात आले. नदी नाल्यांना पाणी दिले गेले. त्यावेळी आमदार पाचपुते यांनी त्याचे श्रेय घेतलं तर समर्थकांनी स्लोगण तयार केल्या. काही जण तर याचसाठी केला होता अट्टाहास इथपर्यंत पोहोचले. नुकतंच कुकडी कालव्याचे उन्हाळी आवर्तन पार पडलं. हे आवर्तन सुरू असताना आमदार पाचपुते यांचे WhatsApp व  facebook वर तीन व्हिडिओ संदेश प्रसिद्ध झाले. त्यात पहिल्याच संदेशात त्यांनी आपण आवर्तनावर लक्ष ठेवून कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी यांचे सतत संपर्कात असून कोणीही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही व तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरून घेतले जातील व तुमची शेती फुलविण्याची जबाबदारी पार पाडली जाईल, अशी भीमगर्जना केली.

हा संदेश पाहून पाणी देण्याची जबाबदारी आमदारांचीच असते आणि ती पार पाडण्याची त्यांनी घोषणा केली म्हणून उन्हाळ्यात शेतक-यांना पाण्याची खूप गरज असते. त्यासाठी मी ही लगेच याबाबत कुठलेही राजकारण डोक्यात न ठेवता सहकार्याची भूमिका घेतली व मी किंवा आमचे सहकारी या आवर्तनात हस्तक्षेप करणार नाहीत. उलटपक्षी गरज पडेल तेथे सहकार्यच करू, अशी घोषणा केली तशाच प्रकारे सर्वांनी वर्तनही केले. या आवर्तनाचा उडालेला फज्जा पाहता व शेतकऱ्यांवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सहन केला नसता व तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागले असते, मात्र करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असणारा लॉकडाऊन व शासन नियमांचे पालन शेतकऱ्यांनी करुन मोठा संयम दाखविला.

मात्र श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. आमदार पाचपुते हे कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी कधीच गंभीर नसतात. मात्र, दुस-याने केलेल्या चांगल्या कामाच श्रेय घेण्यासाठी आघाडीवर असतात व सुडाचे राजकारण कायम करत राहतात त्याचाच भाग म्हणून त्यांना ज्या गावात मतांची आघाडी मिळाली नाही, अशा गावांना पाणी मिळणार नाही असा प्रयत्न आमदार पाचपुते यांनी केला.

आमदारांनी कालवा सल्लागार समिती मध्ये पाण्याचे नियोजन करायला पाहिजे व ठरलेल्या नियोजनाची अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी यांना करू दिली पाहीजे. त्यात कोणी चुकला त्याला जबाबदार धरले पाहिजे, अशी पद्धती राज्यभर आहे. मात्र, तालुक्यात तसे न होता गेल्या अनेक वर्षांपासून आमदार पाचपुते यांचा पाणी प्रश्नी चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप होत असतो. त्यामुळे कायम तालुक्यात पाणी प्रश्नी अन्याय होतो ते आमदार काय ते पालकमंत्री असताना देखील त्यांना या प्रश्नी कधीच न्याय देता आला नाही. तेच याही वेळी घडलं.

ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची नितांत गरज असताना अनेक गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आणि त्यामुळे त्यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. याला केवळ आमदार बबनराव पाचपुते हेच जबाबदार आहेत. त्यांनी आपली जबाबदारी झटकण्यासाठी मी विरोधीपक्षाचा आमदार आहे. त्यामुळे अधिकारी चुकीचे वागत आहेत. त्यांचे विरोधात हक्कभंग आणणार, अशी वल्गना केली. हिम्मत असेल तर त्यांनी हक्कभंग आणून दूध का दूध और पाणी का पाणी करून दाखवावं. जर पाणी सर्वांना मिळालं तर तुमच्यामुळं, अडचण झाली की बोट अधिकारी व सरकारकडे हा कांगावा तुमचा कायमचाच.

जस चांगलं झाल्यावर श्रेय घेता तस आता तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रायश्चित्त घ्यावे, असे आव्हान शेलार यांनी दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here