Rahuri : रमजान ईदपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी देऊ नये; देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमेटीची मागणी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – रमजान महिना व ईदपर्यंत राहुरी तालुक्यातील कापड दुकान, बुट, चप्पल शॉपिंग सेंटर चालू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी देवळाली प्रवरा येथील मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने राहुरीचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांचेकडे करण्यात आली आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण देशासह महाराष्ट्रात Covid 19(कोरोना) ने जागतिक थैमान घातले असून महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या संकटातून राज्याच्या जनतेला वाचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व सर्वच अधिकारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आपल्या राहुरी तालुक्यात आपल्या व इतर अधिकारी यांचे अथक प्रयत्नांमुळे आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही.

रमजान महिना व ईद निमित्ताने राहुरी तालुक्यातील कापड दुकान, बुट चप्पल शॉपिंग सेंटर, कॉस्मेटिक, बांगड्यांची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास या दुकानात मुस्लिम समाज बांधवांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे सामाजिक अंतर राहणार नाही, त्याचे पालन होणार नाही, व गर्दीत एखादा कोरोना बाधित रुग्ण असल्यास राहुरी तालुका आटोक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रमजान ईद पुढच्या वर्षी पुन्हा येईल परंतु एकदा गेलेले जीवन पुन्हा येणार नाही. म्हणून जनतेच्या व देशाच्या हितासाठी रमजान ईद होई पर्यंत राहुरी तालुक्यातील वरील नमूद केलेली दुकाने यांना चालू करण्यासाठी परिस्थितीचे गांभीर्य राखून परवानगी नाकारण्यात यावी, ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने हाथ जोडून कळकळीची विनंती आहे.

या निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा पोलिस प्रमुख आदींना पाठवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here