Newasa : नेवासा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

ज्ञानेश्वर तोडमल यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन ; विना वॉरंट घराची झडती प्रकरण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – विना वॉरंट तसेच राजकीय सुडबुद्धीतून मध्यरात्री घराची झडती घेतल्याप्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठपका ठेवलेल्या नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह तेरा पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकाकर्ते ज्ञानेश्वर तोडमल यांनी नगरचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर तोडमल दि.6 मे 2018 रोजीच्या रात्री आपल्या राहत्या घरात कुटुंबियांसह गाढ झोपेत असताना नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणचंद्र लोखंडे यांनी त्यांच्या पोलीस पथकासह येऊन त्यांच्या घराचे दार ठोठावून त्यांना उठवले. एवढ्या मध्यरात्री पोलीस पथक काहीही न सांगता घरातील सामानाची उचकापाचक करू लागल्याचे पाहून संपूर्ण तोडमल कुटुंब पुरते गांगरून गेले होते.
तरीही ज्ञानेश्वर यांनी धाडस करून, ‘माझ्या घराची झडती का घेत आहात, सर्च वॉरंट आहे का?’ असा प्रश्न पोलीस निरीक्षक लोखंडे यांना विचारला असता त्यांनी, जास्त शहाणपणा करशील तर कोणत्याही गंभीर अशा खोट्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला. या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, सुनील सूर्यवंशी, हवालदार तुळशीराम गीते, बापू रणनवरे, संदीप दिवटे, जयवंत तोडमल, मोहन शिंदे, महेश कचे, सुभाष हजारे, देविदास खेडकर, सविता उंदरे, यांनी तोडमल यांच्या घरातील सामानाची संपूर्ण उचकापाचक करून अस्ताव्यस्त अवस्थेत टाकून दिले.
या झडतीत या पोलीस पथकाला आक्षेपाहर्य असे काहीही आढळून न आल्याने ते माघारी फिरत असताना पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल उत्तम गायकवाड हा परत तोडमल यांच्या घरात थेट आतल्या खोलीत एकटा निघाला. तो कशासाठी परत घरात घुसला हे पाहण्यासाठी ज्ञानेश्वर तोडमलही त्याच्या मागोमाग गेले असता तो त्याच्या खिशातून गावठी कट्टा काढून घरात लपवत असल्याचे त्यांना दिसून आले. तोडमल यांच्या लक्षात सर्व प्रकार आल्याने त्यांनी आरडाओरड करत सर्वांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर गायकवाड याने सारवासारव करत कट्टा परत स्वतःच्या खिशात घातला. आपला कट उधळून लावला गेल्याने चिडलेल्या गायकवाड याने यावेळी जाताना तोडमल यांना, ‘एक ना एक दिवस तुला खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकविल्याशिवाय राहणार नाही, तुला कसे अडकवायचे ते मला चांगलेच ठाऊक आहे’, अशी गर्भित धमकी दिली.
याबाबत तोडमल यांनी नेवासा तहसिलदारांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदनाद्वारे सूचित करूनही त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करून दाद मागितली. खंडपीठाच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी कामी नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट करून त्यांनी केलेला चौकशी अहवाल न्यायालयास सादर केला. सदर अहवाल अत्यंत चुकीच्या पद्धतीने तसेच वस्तुस्थिती डावलणारा असल्याने तोडमल यांनी त्यास आव्हान देणारी रिट याचिका दाखल केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी यावर निकाल देताना, ‘विना सर्च वॉरंट घराची झडती घेणे बेकायदेशीर असल्याचे नमूद करून नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक लोखंडे यांच्यासह तेरा पोलीस कर्मचाऱ्यांचे हे कृत्य बेकायदेशीर ठरवत या सर्वांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत शासनाच्या (वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या) परवानगीने या सर्वांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची परवानगी दिली. याबाबत तोडमल यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांना दि.30 एप्रिल 2020 रोजी न्यायालयीन आदेशाची प्रत तसेच लेखी निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुनरावृत्ती
विना सर्च वॉरंट झडती प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नेवासा पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचार्यांसह 13 जणांवर ठपका ठेवलेला असताना व त्यांच्यावरील कारवाई प्रलंबित असताना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांच्या नवीन चांदगाव येथील निवासस्थानी याच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तोडमल यांच्या झडती प्रकरणात दोषी आढळलेल्या पथकातील विठ्ठल गायकवाड हा पोलीस कर्मचारी माळवदे यांच्या प्रकरणातही सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यावरून हे पोलीस किती निगरगट्ट झाले आहेत ते स्पष्ट होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here