Ahmednagar : शैक्षणिक संस्थांचे पितळ उघड

प्रवेश महाराष्ट्रात अभ्यासासाठी कोटा…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अहमदनगर – राज्यातील कनिष्ट महाविद्यालयात प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी अकरावी-बारावीच्या परिक्षेसह प्रवेष पात्रता परीक्षांच्या तयारीसाठी राज्यसथनमधील कोटा येथे जातात. लॉक डाउन दरम्यान अडकलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या आदेशाने पुन्हा आणल्यानंतर केलेल्या चौकशीत विद्यार्थ्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे एकाच वेळी ही मुले दोन ठिकाणी कशी उपस्थिती लावतात? असा प्रश्न उपस्थित होतो.

भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्‍झॅमिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. पदव्युत्तर कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या अभ्यासासाठी राज्यातील अनेक विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे धडे गिरवण्यासाठी जात आहेत.

मात्र, हे करताना हे विद्यार्थी महाराष्ट्रातील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आपला प्रवेश घेऊन अध्ययन तेथे करीत आहेत. या विद्यार्थ्यांची मात्र आपल्याकडे उपस्थित असल्याची नोंद केली जात आहे. तर हे विद्यार्थी कोटा येथे उपस्थित राहत असल्याची नोंद तेथील संस्थेत घेतली जात असल्याचे कोटा येथून आलेल्या विद्यार्थ्यांनी कबूल केले. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेत या विद्यार्थ्यांचे उपस्थितीची नोंद कशी केली जाते. एकच विद्यार्थीं एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित कसा राहतो, असा प्रश्न उपस्थित होवून शैक्षणिक संस्थांचे पितळ उघडे पडलेले आहे.

यासारखे अनेक प्रकार राज्यात होत असल्यामुळे अनेकांनी त्याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींमुळे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने करण्याचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेतली जात असून, काही संस्थांनी या आदेशाला तिलांजली दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अचानक लॉकडाउन केल्यामुळे कोणाला कोठे जाता येईना. त्यातच अनेक विद्यार्थी कोटा येथे अडकल्याने त्यांच्या पालकांनी सरकारकडे पाठपुरावा करून मुलांना आणण्याचे साकडे घातले. राज्य सरकारने पालकांची मागणी लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामध्ये सुमारे दीड हजार विद्यार्थी कोटा येथे अडकल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झालेले आहे. हे सर्व राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना आता एसटी महामंडळाच्या बसच्या माध्यमातून राज्यात आणले जात असून, त्यांच्या गावी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातून एकूण 70 बस सोडण्यात आल्या असून, प्रत्येक बसमध्ये 23 विद्यार्थी आणून त्यांना त्यांच्या निश्‍चित स्थळी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातून कोट्याला शिक्षणासाठी गेलेल्या 32 विद्यार्थ्यांना दोन बसच्या माध्यमातून शुक्रवारी संध्याकाळी नगरला आणण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे.

“राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणणे आता महत्त्वाचे आहे. त्यांना आणल्यानंतर ते विद्यार्थी कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. याची माहिती घेऊन त्यांच्या उपस्थितीबाबत चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.”
– विशाल सोळंकी, आयुक्त, शिक्षण विभाग पुणे

“सरकारच्या नियमानुसार कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकनुसार अनिवार्य असून, त्याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची आगामी वर्षात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.”
– दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

आयआयटीचे धडे
बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात एखाद्या शैक्षणिक संस्थेत नाम माञ प्रवेश घेतला जातो. कोटा येथे आयआयटीचे धडे गिरवण्यासाठी प्रवेश घेणारे काही विद्यार्थी आहेत. या एक वर्षाच्या काळात ते दोन्ही महाविद्यालय व इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करतात. परंतू एकच विद्यार्थी वर्षभर एकाच वेळी दोन्हीकडे उपस्थित कसा राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here