Karjat : Jamkhed : कर्जत-जामखेडकरांना मिळणार विधान परिषदेला चान्स ?

0

माजी पालकमंत्री राम शिंदेच्या वर्णीसाठी कार्यकर्ते सरसावले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

डॉ अफरोजखान पठाण | राष्ट्र सह्याद्री दि ३

कर्जत : विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच कर्जत जामखेडमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण येत माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागावी यासाठी सोशल मीडियावर वरिष्ठांना मागणी घालण्यात येत आहे. अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेले तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी प्रा. राम शिंदेंना स्थान देण्यात यावी, अशा पोस्ट व्हायरल करत दबावगट निर्माण केला आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे नातू तसेच अल्पावधीतच युवकाचे आयडॉल ठरलेले रोहित पवार यांनी तत्कालीन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मागील पंचवार्षिकमध्ये सत्ताधारी भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षाच्या युती सरकारमध्ये तब्बल डझनभर भर मंत्रीपदाचा अनुभव घेतलेले प्रा. राम शिंदे यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते. राम शिंदेची लढत पवार कुटूंबियाच्या बरोबर असल्याने यंदा सरळ लढतीत त्यांना पराभव चाखावा लागला. यासह नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिलेला दगा-फटकयाची चर्चा आणि त्यावर पराभव झालेल्या भाजपाच्या आमदारांनी पक्षश्रेष्ठीकडे दिलेला त्याचा अहवाल निश्चित दखल घेणारा आहे.
नगर जिल्ह्यातील भाजपाचा पराभव आणि खुद पालकमंत्री राम शिंदे यांचा वैयक्तिक पराभव पक्षश्रेष्ठी आणि जिल्हातील इतर नेत्यांच्या जिव्हारी लागला होता. एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार म्हणून राम शिंदे यांची महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली होती. आपल्या मतदारसंघात शिंदे यांनी विकासकामांचा अनुशेष भरून काढताना त्याच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी अनेक मंत्र्यांना मतदारसंघात पाचारण केले होते. शिंदेंची कामाची पद्धत पाहता आलेल्या मंत्र्यानी त्यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या कार्यपद्धतीवर शाबासकीची थाप टाकली. आणि याच ठिकाणी माशी शिंकली राम शिंदेच्या कार्याने ते राज्यात त्वेषात सक्रिय झाले आणि त्यांची आपोआप मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ तुटली.
यासह त्यांच्या वक्तृत्वाने लोकसभेत स्टार प्रचारक बनविले गेल्याने बारामतीची ती सभा त्यांना मारक ठरली.  मतदारसंघात विकासकामे झाली मात्र त्याचा दर्जा राखता आला नाही. मंत्रीपदाच्या काळात मोजक्याच लोकांशी संपर्क राहिला. सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात नसल्याचा ठपका विरोधकांनी ठेवत त्यावरच विधानसभा निवडणूक केंद्रित करत त्यावर यश मिळवत तब्बल ४३ हजार मतांनी पराभव केला.
या पराभवाने राम शिंदे काही काळ हतबल झाले होते. तर युवक आयडॉल आणि मतदारसंघाचे नेतृत्व पवार कुटूंबीयाच्या घराण्याकडे गेल्याने दोन्ही तालुक्यातील स्थानिक भाजपा अनेक दिवस अज्ञातवासात गेली होती. मात्र, आपण थकलो नाही पुन्हा उभारी घेऊ अशी कार्यकर्त्यांना ताकद देत भाजपामध्ये राम शिंदेंनी पुन्हा नवसंजीवनी निर्माण केली. अनेक ठिकाणी पक्षीय संघटन करण्यावर भर देत पुन्हा आपले नेतृत्व तयार करण्याची मानसिकता राम शिंदेंनी हेरली. नुकतीच विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला. २१ मे ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पुन्हा सोशल मीडियावर राम शिंदेच्या वर्णीसाठी कंबर कसली आहे. तशा पोस्ट व्हायरल करत नेत्याच्या समर्थनात रणांगणात उतरले आहेत.
वर्णी लागण्याची दाट शक्यता
राम शिंदे ओबीसी समाजाचे नेते म्हणून सर्वपरिचित आहे. यासह यंदाच्या निवडणुकीत बारामती पॅटर्नपुढे आणि पवार कुटूंबियाशी सरळ लढत असल्याने त्यांचा पराभव झाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य आणि केंद्रीय पक्षनेतृत्वात असणारी ओळख त्यांचा पथ्यावर असून राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. त्यामुळे कर्जत- जामखेडकरांना दोन आमदार मिळतील अशी अटकळ बांधली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here