Shirdi : 48 दिवसांच्या लॉकडाऊन काळात साई चरणी ०२ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिर्डी – कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे दिनांक १७ मार्चपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले असताना ही दिनांक १७ मार्च ते दिनांक ०३ मे २०२० अशा ४८ दिवसाच्‍या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०२ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

डोंगरे म्‍हणाले, देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरिता व विषाणुची बाधा एकमेकांना होऊ नये म्‍हणून भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे.  साईबाबांचा महिमा व त्‍यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली असून त्‍यांचा भक्‍त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे.

याकाळात टाटा स्‍कॉय, संस्‍थान संकेतस्‍थळ व मोबाईल अॅप्‍सव्‍दारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्‍त घर बसल्‍या घेत आहेत. यामध्‍ये टाटा स्‍कायवर सुमारे ३५ लाख साईभक्‍त अॅक्‍टीवेट असून ०१ लाख १२ साईभक्‍तांनी संस्‍थानचे मोबाईल अॅप्‍स डाऊनलोड केलेले आहे. तर संकेतस्‍थळावर दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्‍त भेट देत आहे.

साईबाबांचे मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्‍तांनी बाबांना दक्षिणा देण्‍याची परंपरा सुरु ठेवली असून जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातून साईभक्‍त संकेतस्‍थळाव्‍दारे व मोबाईल अॅप्‍सव्‍दारे ऑनलाईन देणगी संस्‍थानला पाठवत आहे. दिनांक १७ मार्च ते ०३ मे २०२० अशा ४८ दिवसाच्‍या या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०२ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याचे डोंगरे यांनी सांगितले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here