मामा मुळे भाची सह १७ जणांना केले होम क्वारंटाइन

राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी

अकोले : तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि नाशिकच्या ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाला आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या अकोल्यातील त्याच्या भाचीसह तिच्या कुटुंबाला नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर घरातील आणखी १७ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

माळीझाप (अकोले) येथील तरुण आपल्या पत्नीसह नाशिकमध्ये स्थायिक आहे. ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या या पोलिस कर्मचाऱ्याची ड्युटी करोनाचे हॉट स्पॉट असलेल्या मालेगावमध्ये होती. तेथे तो आजारी पडला. २२ एप्रिलला त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे दुसऱ्याच दिवशी त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या पत्नीचीही आरोग्य तपासणी केली असता तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात आठवडाभर गुप्तता पाळण्यात आली.

मात्र, या पोलिस कर्मचाऱ्याच्या सानिध्यात आलेली त्याची भाचीदेखील आजारी पडल्याने त्यांनी सावध भूमिका घेत अकोल्याच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाने तिघांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी हलविले आहे. तर घरातील अन्य सतरा लोकांना म्हाळादेवी केंद्राअंतर्गत होम क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकल्याचे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसले तरी दक्षता म्हणून खबरदारी घेत असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here