Home Editorial Editorial: काश्मीरमधील वर्चस्वाची लढाई !

Editorial: काश्मीरमधील वर्चस्वाची लढाई !

2

राष्ट्र सह्याद्री |4 मे 

काश्मीरमधील विशेष दर्जा असलेले ३७० वे कलम गेल्या पाच ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आले. तसेच या राज्याचे एक केंद्रशासित प्रदेश आणि एका अर्धराज्याचा दर्जा असलेल्या राज्यात रुपांतर करण्यात आले, तेव्हापासून काश्मीरमधील नेत्यांना बंदीवासात ठेवण्यात आले होते. तेथे बराच काळ संचारबंदी होती. लष्कराचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा बंदोबस्त कसा करण्यात आला, याच्या सरकारी यशोगाथा वारंवार सांगितल्या जात होत्या; परंतु अधूनमधून अतिरेकी आणि लष्कराच्या चकमकी चालूच आहेत.

विशेष म्हणजे गेल्या दोनच दिवसांपूर्वी लष्कराचा वापर जनसंपर्कासाठी केला जात असल्याचे काही तज्ज्ञांचे मत छापून आले. लष्कर हे सज्ज असलेच पाहिजे, त्याबाबत दुमतही नाही; परंतु परकियांविरोधात लढण्याऐवजी आपल्याच देशातील वाट चुकलेल्यांच्या विरोधात लढताना लष्कराची शक्ती खर्च होत आहे. काश्मीरचा विशेष दर्जा काढला, की तिथे लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असे जे स्वप्न दाखविण्यात आले होते, ते अजून स्वप्नाच्या पातळीवरच  आहे. विकासाच्या प्रक्रियेत संबंधित राज्यांतील लोकांना विश्वास देऊन सहभागी करून घ्यावे लागते, त्याचा विसर आपल्याला पडला आहे.

त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत चकमकी कमी झाल्या असतील, दहशतवादी हल्ले कमी झाले असतील; परंतु ते थांबले नव्हते, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करता येणार नाही. गेल्या नऊ महिन्यांत काश्मीरमध्ये असलेल्या पूर्वीच्या अतिरेकी संघटना शांत झाल्या असल्या, तरी नव्या अतिरेकी संघटना जन्माला येत आहेत. पाकिस्तानच्या कारवायाही थांबलेल्या नाहीत. भारतीय लष्कराचे केंद्र असलेल्या ठिकाणी पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा चालू आहे. सरकार चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांची संख्या सांगते; परंतु त्याचवेळी आपल्या किती बहाद्दूर जवान आणि अधिका-यांना प्राॅक्सी वाॅरमध्ये हुतात्मा व्हावे लागते, हे आपण तेवढे गांभीर्याने घेत नाही. ठराविक वेळी जय जवान, जय किसान अशा घोषणा देऊन समाधान आपण मानतो; परंतु जवानांना शूज आणि पुरेसे कपडे देण्यातही आपण कमी पडलो, हे कॅगच्या अहवालावरून स्पष्ट झाले.

शनिवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जवान हुतात्मा झाले; पण त्यापूर्वी त्यांनी नागरिकांचे प्राण वाचवले. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराचे कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नायक राजेश, लान्सनायक दिनेश आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलातील उपनिरीक्षक शकील काझी हे पाच जण हुतात्मा झाले. लष्कर ए तोयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही संघटना यापूर्वी  काश्मीर खो-यात कार्यरत होती, असा इतिहास नाही. याचा अर्थ काश्मीरमध्ये आता नव्या अतिरेकी संघटनेचा उदय झाला आहे.

सरकार आणि लष्कराचे लक्ष विचलीत करण्यासाठी जुन्याच संघटनांतील अतिरेकी नवी संघटना काढून दहशतवादी कारवाया करीत असतात, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिज्बुल मुजाहीदिन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला. चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम राबवली. यानंतर शनिवारी लष्कराला आणखी माहिती मिळाली आणि दहशतवाद्यांशी जवानांची चकमक सुरू झाली; पण दहशतवादी तिथून निसटले. भारतीय लष्करातील २१ राष्ट्रीय राफल्सच्या युनिटचे सीओ कर्नल आशुतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू होती.

त्यावेळी एका घरात संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कर्नल शर्मा त्या ठिकाणी गेले. तिथे एका घरात दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस धरले होते. यानंतर कर्नल शर्मा यांच्या टीमने जवळपास राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. नागरिकांना बाहेर काढत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. या वेळी लष्कराची दुसरी टीमही तिथे पोहोचली आणि त्यांनी घराला वेढा घातला. घराला वेढा घातल्यानंतर दुसऱ्या टीमने कर्नल शर्मा यांच्या टीमशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क झाला नाही.

गोळीबारात टीमच्या रेडिओ सेटचेही मोठे नुकसान झाले. रात्र झाली आणि त्यातच मुसळधार पाऊस सुरू होता. सर्व प्रयत्न करून झाल्यावर कर्नल शर्मांच्या टीमशी संपर्क न झाल्याने अखेर शर्मांच्या मोबाइलवर फोन करण्यात आला. हा फोन एका दहशतवाद्याने उचलला. अंधाराचा फायदा घेऊन लपून बसलेले दहशतवादी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते; पण लष्कराच्या दुसऱ्या टीमने त्यांचा खात्मा केला. यात दोन दहशतवादी मारले गेले. यातील एक दहशतवादी हा लष्कर ए तोयबाचा कमांडर हैदर असल्याचे सांगण्यात येते.

आता जी वृत्ते प्रसिद्ध झाली, त्यात लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरला कसे यमसदनी धाडले, याचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला; परंतु त्याचवेळी आपल्या लष्कराचा एक अतिशय महत्त्वाचा अधिकारी आणि पाच जवान हुतात्मा झाले, त्याचे दुःख तितक्या तीव्रतेने दिसले नाही. केवळ बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी नेहमीची भाषा करून  उपयोग होत नसतो.

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास धुमश्चक्री सुरू होती. हुतात्म्यात २१ राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शर्मा यांनी यापूर्वी अनेक यशस्वी काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना दहशतवादी बंदी बनवणार आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानुसार, या ठिकाणी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहीम राबवण्यात आली.

दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये कर्नल शर्मा यांनी नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व केले होते. दहशतवा्द्यांविरोधात लढताना दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना दोन वेळा सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. मागच्या पाच वर्षांत दहशतवाद्यांविरुद्ध लढताना हुतात्मा झालेले कर्नल रँकचे ते पहिले अधिकारी आहेत. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल एमएन राय आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले होते. कर्नल शर्मा बऱ्याच काळापासून काश्मीर खोऱ्यामध्ये तैनात होते.

एकदा कर्नल शर्मा आपल्या सहकाऱ्यांसमवेत रस्त्यावर असताना एक दहशतवादी कपडयांमध्ये ग्रेनेड लपवून त्यांच्या दिशेने येत होता. शर्मा यांनी लगेच त्याची चाल ओळखली व क्षणाचाही विलंब न लावता आपली बंदूक काढली व त्या दहशतवाद्याला तिथेच कंठस्नान घातले.  शर्मा यांच्या सतर्कतेमुळे युनिटमधील जवानांचे आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे प्राण वाचले. यासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दोन अधिका-यांसह पाच जणांना आपण गमावून बसलो.

काश्मीर खो-यातील गेल्या नऊ महिन्यांतील शांतता कशी वरवरची आहे आणि संधी मिळाली, की अतिरेकी कसे डोके वर काढतात, हे हंदवाडा घटनेतून स्पष्ट झाले आहे. अशा घटना टाळायच्या असतील, तर तिथे पुन्हा एकदा विकासाचे वारे वाहू द्यावे लागेल आणि विकासाच्या पर्वात सर्वांना सहभागी करून घ्यावे लागेल. गेल्या सहा-सात वर्षांत काश्मीरसाठी मंजूर झालेली रक्कम, तिथली विकासाची ठप्प झालेली कामे आणि वेगवेगळ्या कामांत होत असलेला गैरव्यवहार थांबवून काश्मीर वेगळे नाही, तर तो भारताचाच भाग आहे, हे पटवून द्यावे लागेल.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here