Newasa : कोरोनामुळे छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

3

शासनाकडून मदतीची अपेक्षा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | सतिश टेमक 

करजगांव : मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये साखरपुडा, लग्नसभारंभ, वाढदिवस, डोहाळे, विविध प्रकारची उद्घाटने आदी शुभकार्यांची रेलचेल असते. मात्र, यंदाचा लग्न हंगाम कोरोना प्रादुर्भावामुळे अडचणीत आल्याने फोटोग्राफर आर्थिक संकटात सापडले आहेत. फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर बांधवांचा प्रमुख आधार असलेला लग्न हंगाम कोरोनामुळे प्रभावित झाल्यानंतर विविध फोटोग्राफर बांधवांच्या चेह-यावर चिंता पसरल्या आहेत. लग्न हंगामातून होणा-या उलाढालीवरच फोटोग्राफरचा वार्षिक व्यवहार अवलंबून असतो, अशा स्थितीत लग्न हंगामालाच बसलेला फटका फोटोग्राफर बांधवांची आर्थिक घडी विस्कटविणारा ठरत आहे.

बेरोजगारी, सततचा दुष्काळ व नापिकीला कंटाळून वेगळी वाट म्हणून तसेच आपल्या छंदातून अनेकांनी फोटोग्राफी व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यानच्या, काळात फोटोग्राफी व्यवसायात होणारे बदल, स्पर्धा, नवनवीन आधुनिक सामुग्रीचा होणारा वापर या पार्श्वभूमीवर स्पर्धेत टिकण्यासाठी व लग्न हंगामाची तयारी म्हणून महिनाभरापूर्वी उसनवारी करत लाखो रुपयांची जुळवाजुळव करत कॅमेरा व पूरक साहित्य खरेदी केले. लग्न हंगाम चांगला होऊन आर्थिक उलाढाल झाल्यावर कॅमेऱ्यासाठी गुंतवलेले पैसे वसूल होतील. अशी आशा बाळगूण अनेक छायाचित्रकारांनी लग्न ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैवाने कोरोनाचे संकट कोसळून लॉकडाऊन व जमावबंदी सुरु झाली. त्यातच कोरोना रोखण्यासाठी जमावबंदी आवश्यक असल्याने लग्नासारखे समारंभ थांबले.

परिणामी अनेक छायाचित्रकार आर्थिक अडचणीत अडकले आहेत. सद्यस्थितीचा विचार करता, धुमधडाक्यातील लग्न समारंभ सुरु व्हायला किती वेळ लागेल, हे अनिश्चित असल्याने फोटोग्राफी व्यवसाय सुरळीत होण्यासही वेळच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर लग्न हंगाम तयारीसाठी छायाचित्रकारांनी कॅमेरा व इतर साहित्यासाठी उसनवारीने, स्वतः जवळील तसेच बॅंकेचे कर्ज घेऊन गुंतविलेले पैसे वसूल कधी होणार व कसे होणार, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला असून आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आता करायचं काय? हाच प्रश्न हजारो छायाचित्रकारा समोर उभा राहिला आहे.

वेगवेगळ्या सुखांच्या, जल्लोषाच्या कार्यक्रमात छायाचित्रकार इतरांचे सुखाचे क्षण टिपतो. हा क्षण टिपताना छायाचित्रकांना परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली सद्यस्थिती व संकटात आलेला लग्न हंगाम दुःख निर्माण करणारा ठरत आहे. कारण लग्न समारंभावरच फोटोग्राफी व्यवसाय अवलंबून आहे. कोरोनानंतर यंदाचा लग्न हंगाम नेहमीप्रमाणे होऊ शकत नाही. त्यातच आता इच्छुकांनी लग्न सोहळे साधेपणाने व रजिस्टर पद्धतीने साजरे करण्याचे निर्णय घेतले. परिणामी छायाचित्रकार बांधवांचे आर्थिक चक्र विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक छायाचित्रकार बांधवांवर उपासमारीची वेळ आलीय.

फोटोग्राफर हे कलाप्रियतेने फोटोग्राफी व्यवसायात आलेले असतात.अशा स्थितीत बहुतेकदा ते आर्थिक अडचणींचा सामना करत व्यवसाय सांभाळतात. अलीकडे मोबाईल फोटोग्राफीचा फटका व्यवसायाला बसत असताना रोजंदारी मिळणेही काहींसाठी अवघड बनलेय. याशिवाय दुकानांची भाडे रक्कमही अनेकांना परवडत नाही. एकूणच विविध अडचणींना तोंड देत असतानाच आता कोरोनामुळे व्यवसाय जागेवरच थांबला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे सोळा-सतरा हजार फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केवल फोटोग्राफी व्यवसाय हाच कुटुबांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन असणारे अनेक फोटोग्राफर आहे. मागील वर्षी लग्न झालेल्या अनेकांकडे फोटोग्राफीची बाकी आहे. ती जरी बाकी जमा झाल्यास अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

फोटोग्रॉफी एक कला आहे. या कलेवरच छायाचित्रकारांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. विविध अडचणींना तोंड देत असतानाच आता कोरोनामुळे व्यवसाय जागेवरच थांबला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. जिल्ह्यामध्ये सोळा ते सतरा हजार फोटोग्रॉफर व व्हिडिओग्रॉफर आहे. छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे छायाचित्रकारांना शासनाने मदत करावी.

– नितीन भिसे (जेष्ठ फोटोग्राफर व मार्गदर्शक, फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास संस्था, अहमदनगर)

विज्ञान शाखेतील उच्च घेऊनही नोकरी नसल्यामुळे वडिलांबरोबर फोटोग्रॉफी करत आहे. नुकतेच महागडे कॅमेरे घेतले होते. लॉकडाऊनमुळे विवाहसोहळे रद्द झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
– सागर काळे (गुरूकृपा फोटो स्टुडिओ पानेगांव ता.नेवासा)

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here