प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – जगभर थैमान घालून हाहाकार माजवणाऱ्या कोरोनासारख्या दुर्धर आजारावर अजून तरी उपचार सापडलेला नाही. या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यातील डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस, प्रशासन या सर्वांचा वाटा मोठाच. पण हे सर्व करत असताना त्या सर्व घटकांचा जनतेशी समन्वय साधणाऱ्या पत्रकार बांधवांचा जनजागृतीत वाटा मोठा आहे.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी पत्रकारांपुढे नतमस्तक होणारे राजकीय नेते एकीकडे जाहिरातबाजी करत आपण केलेल्या मदतीचा स्वतःहून जयघोष करत असले तरी त्यांना या कठीण परिस्थितीत धावपळ करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचा विसर पडल्याचे चित्र आहे. समाजासाठी झोकून देणाऱ्या पत्रकारांना कौतुकाची थाप किंवा भावनिक आधारचा हात हवा असतो. अगदी हीच बाब हेरत माध्यम विश्लेषक अवधूत राऊत यांनी पत्रकारांशी असणारे आपले ऋणानुबंध समोर ठेवत पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला.