Rahuri : गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर बियर वाहतूक करणारा आयशर टेम्पो उलटला

तळीरामांची चंगळ 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर आज (बुधवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा आयशर टेम्पो उलटला. त्यामुळे तळीरामांची चंगळ झाली. वेळीच पोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्याऐवजी लाठीचा प्रसाद मिळाला.

नगरवरून कोल्हारच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो (क्रमांक एम एच  17 बी वाय   3518) मधून बियरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने  टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच तळीरामांनी बियरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली. जाणाऱ्या – येणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांनी बियरच्या बाटल्या गोळा करुन घरी नेल्या. लॉकडाऊन काळात बियरबार व शॉपी बंद होत्या. मंगळवारी काही वेळ वाइन शॉप खुले झाले पण गर्दी लक्षात घेता प्रशासनाने लगेचच सील केले. मात्र, आज बियरचा टेम्पो पलटी झाल्याने गुहा परिसरातील अनेकांनी हात मारला. त्यामुळे बियरच्या बाटल्या लुटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यासारखा होता.

दरम्यान, चालक व क्लिनर यांना जमा झालेल्या गर्दीला आवरावे कसे असा प्रश्न पडला असता पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने बियरच्या बाटल्या नेण्यास आलेल्या अनेकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. अनेकांना बियर न मिळाल्याने हिरमोड झाला. पोलिसांनी गर्दीस पांगवून बियरच्या बाटल्या गोळा करण्यास मजूर लावून टेम्पोत भरल्या. त्यानंतर टेम्पो चालक व क्लिनर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये मद्य शौकिनांची चंगळ झाल्याने तळीरामांनी उपरवाला देता है तो छप्पर फाडके, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here