Shrigonda : आदिवासी महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ ; पोलिसांच्या कार्याचा पाढा वरिष्ठांसमोर वाचणार पीडित महिला..

अपघातात पती गंभीर जखमी झाल्याने, पत्नीची धडपड.. पोलिसांचे मात्र, याप्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष..

प्रतिनिधी / राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदे – तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील रहिवासी असलेल्या पूजा काका काळे या महिलेच्या पतीचा शुक्रवारी (दि. 1) रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदे–दौंड रोडवरील सरस्वती नदीच्या पुलावर अपघात झाला. अज्ञात ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने महिलेचा पती नामे काका संजू काळे यास दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.

ट्रॅक्टर घटना स्थळावरून निघून गेला. मोठी दुखापत झाल्याने त्याच्यावर श्रीगोंद्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. घडलेल्या घटनेची माहिती श्रीगोंदे पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेलेली पीडित महिला पूजा काळे हिची फिर्याद घेण्याऐवजी श्रीगोंदे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती न देता तिला अर्वाच्य भाषा वापरत, ”तुम्ही पारधी लोक स्वतः दारू पिता अन् कुठेपण पडता, असे म्हणून फिर्याद नोंदवून घेण्यास नकार देत या महिलेला हुसकावून दिले.

श्रीगोंदे तालुक्यातील आदिवासी महिलेने गेल्या चार पाच दिवसांपासून पतीसोबत झालेला हा प्रकार पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिस या प्रकरणी कोणतीही दखल घेत नसल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे.

काका संजू काळे याचा अपघात झाला, त्यावेळी घटनास्थळी मोठी बघ्यांची गर्दी जमली होती. या ठिकाणी असलेल्या दुकानं व देवालयांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने धडक दिलेला ट्रॅक्टर सहजरित्या पोलीस प्रशासन ताब्यात घेऊ शकते. मात्र, सदर महिला ही आदिवासी समाजाची असल्याने या प्रकरणी पोलीस प्रशासन उदासीन असून, तिच्या या घटनेकडे पोलीस डोळेझाक करीत दुर्लक्ष करीत आहेत. ट्रॅक्टरचा तपास चालू असून, तुझी फिर्याद नंतर घेतो. म्हणत उडवाउडवीची उत्तरे देत, पीडितेला तक्रार देण्यापासून श्रीगोंदे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी परावृत्त केल्याचेही तिने प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

समाजातील प्रत्येक घटकांना एकाच मोजमापात तोलणे गैर असल्याचे तिचे म्हणणे आहे. आम्ही साधारण परिस्थितीतील लोक असून, मोलमजुरी करीत आमच्या मुलांचे शिक्षण करीत आहोत. हातावरचे पोट असल्याने कुटुंबाचा आधार असलेला माझा पती अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने, आमच्यावर आता मोठे संकट ओढवले असून, पोलिसांनी माझी दखल घ्यावी. अन्यथा न्यायासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे ही माध्यमांना सांगितले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here