Editorial : टोळझाडीचे बुमरँग

1

राष्ट्र सह्याद्री | 7 मे

भारतीय जनता पक्षा इतका समाज माध्यमांचा वापर कुणीच केला नसेल. समाज माध्यमांवर विरोधकांचा समाचार घेण्यासाठी एक टीमच तयार करण्यात आली. जल्पकांची एक फाैज विरोधकांवर किंवा समाज माध्यमांतून भाजपवर टीका करणा-यांच्या विरोधात तुटून पडायची. टीकाकारांना आणि विरोधकांना समाज माध्यमांतून हैराण करून सोडायची. भाजपचे खरे-खोटे विचार ही फाैज पसरवायची. विरोधकांना समाज माध्यमातून धमक्या द्यायची. शिवीगाळ करायची. त्यासाठी खास पेज चालविली जायची.

निवडणुकीच्या काळात तर खास पगारी फाैज हे काम करायची. त्याचा भाजपला फायदा व्हायचा. त्यावेळी कुणी अशा जल्पकांच्या फाैजाविरु्दध तक्रार केली, तर ती घेतली जात नसे. उलट, विरोधकांना टीकेचा प्रतिवाद करता येत नाही, अशी भूमिका घेतली जायची. समाज माध्यमेही दुहेरी हत्यारे आहेत, त्यांचे कधीही बुमरँग होऊ शकते, हे त्या वेळीही तज्ज्ञ वारंवार सांगत होते; परंतु भाजपला त्यावेळी फक्त जल्पकांचे हल्लेच दिसत होते. विरोधकांचे नामोहरम होणे उन्माद वाढवित होते. जल्पकांच्या फाैजा कितीही असल्या, तरी आता सामान्य माणूसही समाज माध्यमांचा वापर करायला लागला आहे. तोही जल्पकांच्या टीकांना प्रत्युतर करायला लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ही समाज माध्यमे  वापरणा-यांच्या तावडीतून सुटत नाहीत. एखादी गोष्ट चुकीची असली, तर त्यावर समाज माध्यमातून भरपूर टीका होते. दिवसभर ट्रोल केले जाते. ही समाज माध्यमे जेव्हा आपल्या फायद्याची होती, तेव्हा त्यांचा दुरुपयोग चालत होता आणि आता त्यांच्यातून आपल्यावरच टीका व्हायला लागली, तर कारवाई करा, अशी मागणी करायची, ही नवी नीती वापरली जात आहे. इंटरनेटवर ट्रोल  करणा-यांची दखल त्यामुळेच भाजपला घ्यावी लागली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करीत, त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात होती, तेव्हा भाजपला गुदगुल्या होत होत्या. नव्हे, तेव्हा भाडोत्री जल्पकच अशी टीका करीत होते. आता फडणवीस यांच्यावर टीका व्हायला लागली, तर समाज माध्यमातून टीका करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या जात आहेत. ट्रोल करणारे शिवीगाळ करीत असतील, धमक्या देत असतील, तर त्यांच्यावर अवश्य कारवाई करायला हवी. त्याबाबत कुणाचेही दुमत असता कामा नये; परंतु भाजप सरकारच्या काळात करण्यात आलेल्या तक्रारी मग फडणवीस गृहमंत्री असताना का दाखल केल्या नाहीत, याचे उत्तरही द्यायला हवे.

फडणवीस यांना इंटरनेटवर ट्रोल केल्या जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भारतीय जनता पक्षाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. फडणवीस यांना अनुसरून विनाकारण धमक्या दिल्या जात असल्याचे कथित आरोप भाजप करत आहे. कोरोना विषाणू आणि टाळेबंदीच्या काळातही फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध खोट्या खटल्यांची माहिती समाज माध्यमांतून पसरवली जात आहे, असेही भाजपने म्हटले आहे.

महाराष्ट्राचे पोलिस इतके कधी सत्ताधा-यांचे ऐकायला लागले, की माजी मुख्यमंत्र्यांना धमकी देणा-यांची तक्रारही ते दाखल करून घ्यायला तयार नाहीत. खरेतर सध्या पोलिस कोरोनायोद्धे झाले आहेत. धमक्यांसारख्या घटनांचा तपास करायला त्यांना सध्या वेळही नाही. पोलिसांची ही हतबलता गृहमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनीही समजून घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला, की अशा जल्पकांच्या टोळ्यांविरोधात भाजपने कारवाई करण्याचा आग्रह धरला, तर तो समजण्यासारखा आहे.

आता परिस्थिती काय आहे आणि आपण कशाची मागणी करतो आहोत, याचे भान भाजपने ठेवायला हवे; परंतु तेवढा धीर भाजपला नाही. भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी फडणवीस यांच्यावर टीका करणा-यांविरोधात तक्रार दाखल केली. अशाच स्वरुपाची तक्रार विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनीदेखील रत्नागिरी पोलिस अधीक्षकांकडे दाखल केली आहे. फडणवीस समाज माध्यमांत लाइव्ह येताच त्यांना ट्रोल केले जात आहेत. खोटे मेसेज आणि कमेंट टाकल्या जात आहेत, असे त्यांनी आपल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे.

एका विरोधीपक्ष नेत्याला अशा स्वरुपाच्या धमक्या मिळत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे विधान परिषद सदस्य अनिल सोले यांनीसुद्धा फडणवीस यांना ट्रोल करण्यावरून संताप व्यक्त केला. त्यांना ट्रोल करत असताना अतिशय वैयक्तिक टीका केल्या जात आहेत असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून केवळ फडणवीसच नव्हे, तर त्यांच्या कार्यकाळात मंत्री राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटलांसह अनेकांना ट्रोल करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. ही नेते मंडळी समाज माध्यमांत लाइव्ह येताच ट्रोलिंग करण्यास सुरुवात होत आहे. भाजपच्या नेत्यांना मुद्दाम विरोधी विचारांचे पक्ष टार्गेट करत आहेत, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

राजकीय नेत्यांना ट्रोल केले जाण्याची बाब काही नवीन नाही. अनेक स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनासुद्धा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. नुकतेच राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर समाज माध्यमातून टीका केली, म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका अभियंत्याला मारहाण केली. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले. राष्ट्रवादीचे आणखी एक नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला भूतकाळ आठवण्याचा सल्ला दिला आहे.

भाजपची सत्ता असताना मला आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले होते. पोलिसांत तक्रार करूनसुद्धा काहीच कारवाई झाली नाही. ट्रोल करणारे हँडलर प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप यांचे समर्थक होते, असा आरोप पाटील यांनी केला. भाजपने किती ट्रोलर्सला पैसे दिले ते आधी स्पष्ट करावे, असा पलटवार पाटील यांनी केला आहे. फडणवीस पेज कोण चालवित होते, असा सवाल पाटील यांनी केला आहे. भाजपचे सरकार असताना विरोधकांवर किती विकृत टीका केली जात होती, हे सांगण्याची आवश्यकता नाही. ख

खरेतर अशा विकृतीला सर्वांनीच विरोध करायला हवा; परंतु आपल्या सोईचे असेल, तर समाज माध्यमे चांगली आणि त्यांचे बुमरँग झाले, की ती वाईट असे सोईस्कर गणित करता येत नसते. जल्पकांच्या फाैजा समाज माध्यमांत ज्या भाजपने आणल्या, त्या काढून घेतल्या, तरी समाज माध्यमातून ट्रोल होण्याची विकृती थांबायला सुरुवात होईल. भाजपचे पाहून नंतर काँग्रेससह अन्य पक्षही टोळझाडीची नियुक्ती करायला लागले आहेत. त्यांनाही मग टोळधाडी थांबविता येतील.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत ट्रोल करणाऱ्या 341 जणांविरुद्ध गेल्या आठवडाभरात खटले दाखल केले आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्सच्या आकड्यानुसार, महाराष्ट्रात 2016 मध्ये सायबर क्राइमचे 2,380 खटले, 2017 मध्ये 3,604 खटले आणि 2018 मध्ये 3,511 खटले दाखल झाले आहेत. केवळ खटले दाखल होऊन उपयोग नाही, तर त्यातील किती लोकांना शिक्षा झाली, हे लोकांसमोर येणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यातून टोळझाड करणा-यांना जरब बसविता येईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here