Editorial : बेजबाबदारपणा

राष्ट्र सह्याद्री | 8 मे

एखाद्या देशाचा नेता संकटकाळात देशाला कसा धीर देतो, संकटातून देशाला बाहेर काढून देशवासीयांचे जगणे कसे सुखकर करतो, यावर त्याचे नेतृत्त्व अवलंबून असते. कोरोनाच्या विषाणूमुळे सर्व जगच गोंधळून गेलेले आहे. युरोप, अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे तर कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयारच नव्हती. एवढ्या आरोग्य सुविधा आणि संपत्ती असतानाही केवळ योग्य नियोजन न केल्याने युरोप आणि अमेरिकेत दोन लाखांहून अधिकांचा बळी कोरोनाने घेतला. त्याउल, प्रश्न समजावून घेऊन उपाययोजना केली, तर गरीब राष्ट्रेही कोरोनाच्या संकटावर यशस्वी मात करू शकतात, याचे उदाहरण आशिया खंडातील अनेक देशांत दिसतात.

दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, तैवानसह अन्य देशांनी टाळेबंदी आणि चाचण्यांवर भर दिल्याने कोरोनाला आळा घालण्यात त्या देशांना यश आले. अमेरिकेने मात्र टाळेबंदीचे योग्य नियोजन केले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचे व्यवस्थापन जमलेच नाही. राष्ट्रप्रमुख आपल्या वागण्यातून इतरांपुढे धडा घालून देत असतात. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नेते सातत्याने मास्क घालून, सामाजिक अंतराचे पथ्थ्य पाळून बैठका घेतात. लोकांना ते दिसते. त्यामुळे सामाजिक अंतराचे आणि मास्क पाळण्याचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवले जात असते.

ट्रम्प मात्र कधीही मास्क लावताना दिसले नाहीत. सामाजिक अंतराचा नियम धुडकावून लावताना ते दिसले. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी सार्वजनिक जीवनात वापरताना मास्क लावले नाहीत आणि सामाजिक अंतराचे पथ्थ्य पाळले नाही, तर बिघडले कोठे, अशी भावना झाली असली, तर त्याचा दोष नागरिकांकडे कमी आणि नेत्यांकडे अधिक जातो. टाळेबंदी हा कोरोनाच्या समस्येवरचा एकमेव उपाय नाही, हे मान्य; परंतु ज्या साथीच्या आजारावर उपचार नाही, प्रतिबंधात्मक लस नाही, शिवाय तो साथीचा आजारही असा तसा नाही, तर तो जीवघेणा आहे. अशा स्थितीत मग शक्य ते उपाय केलेच पाहिजेत; परंतु ट्रम्प यांच्यासारख्या आढ्यताखोर व्यक्तींना ते कोण समजावून सांगणार? उच्चशिक्षित अध्यक्षही लोकांना ब्लिचिंग पावडर, जंतूनाशक पिण्याचा आणि अतिनील किरणांचा वापर करण्याचा सल्ला देत असेल, तर अशा अध्यक्षांची कीव करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. टाळेबंदीचा लोकांना कंटाळा येतो, त्यातून राष्ट्राचे आर्थिक नुकसानही होते; परंतु लोकांचे आरोग्य महत्त्वाचे, की अर्थव्यवस्था याचा निर्णय घेता यायला हवा.

भारतासारख्या अनेक देशांनी लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले असताना ट्रम्प यांनी कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू वाढले, तरी चालतील; परंतु अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात एखादा अध्यक्ष असे मत व्यक्त करीत असेल, तर धन्य तो अध्यक्ष आणि धन्य तेथील जनता असे म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आता ट्रम्प यांच्या पंक्तीला ब्राझीलचे अध्यक्ष जेइर बोल्सोनारो बसले आहेत. ट्रम्प यांच्यासारखेच त्यांनाही कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य नाही.

बोल्सोनारो नेहमीच सामाजिक अंतराच्या पथ्थ्याकडे नकारात्मकतेने पाहत आले आहेत. नुकतेच त्यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. ब्राझीलमध्ये दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असताना बोल्सोनारो यांनी परिस्थितीचे वर्णन मग काय झाले, अशा शब्दांत केले आहे. फ्रान्समध्ये लोक अन्नावाचून मरत असताना आणि आंदोलने तीव्र झाली असताना राणी अँटोनिवा हिने रोटी मिळत नसेल, तर ब्रेड खा असा जो सल्ला दिला होता, त्याची आठवण बोल्सोनारो यांचे वक्तव्य ऐकून होते. लोकांच्या संयमाचा अंत झाला,  त्यातून १९ व्या शतकात फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. ब्रासिलियामध्ये रविवारी झालेल्या रॅलीत राष्ट्राध्यक्षांनी ब्राझीलच्या जनतेला कामावर परत जाण्याचा, हँडशेक करण्याचा सल्ला दिला. तसेच अनुयायांना सेल्फी काढण्याची परवानगीही दिली.

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांहून अधिक आहे, तर कोरोनामुळे आतापर्यंत सात हजारांहून अधिक जणांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील राष्ट्राध्यक्षांचे वर्तन कसे असायला हवे, हे वेगळे सांगायला नको; परंतु सत्तेने गुर्मी, बेजबाबदारपणा आणि बेफिकिरी येते, हे बोल्सोनारो यांच्या वर्तनातून दिसते. बोल्सोनारो यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत एका पत्रकाराने विचारल्यानंतर बोल्सोनारो यांनी म्हटले, “मग काय झाले? इतके लोक मेले तर मी काय करणार आहे? मी काही चमत्कार नाही करू शकत.” बोल्सोनारो यांनी यापूर्वी कोरोनाचा उल्लेख सर्दीचा एक प्रकार असा असा केला होता.

माध्यमे याविषयी फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप केला होता. अध्यक्षच बेजबाबदार असल्यानंतर त्यांच्या अनुयायांकडून शहाणपणाची अपेक्षा करणे त्याहून अधिक मूर्खपणा आहे. बोल्सोनारो यांच्या अनुयायांनी ‘सोशल मीडिया’वर शवपेटीचे खोटे फोटो टाकायला सुरुवात केली. देशातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा फुगवून सांगण्यासाठी रिकाम्या शवपेट्या दफन करण्यात येत आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. अध्यक्षांचाच माध्यमांवर विश्वास नसल्यावर अनुयायांना त्यांच्यावर हल्ले करण्याची जणू मोकळीकच मिळाली. बोल्सोनारो यांच्या रविवारच्या रॅलीत तीन पत्रकारांवर हल्ले झाले आणि सर्वोच्च न्यायालय बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराला शिडीवरून खाली ढकलण्यात आले आणि त्याला लाथा घालण्यात आल्या.

लोक एकीकडे कोरोनापासून संरक्षण करण्याचा आणि तो झाला, तरी त्यावर उपचारांनी मात करण्याचा प्रयत्न करीत असताना बोल्सोनारो यांनी मात्र माझ्यासारख्या स्पोर्टस्‌ची पाश्वर्भूमी असणाऱ्या माणसाला कोरोना झाला, तरी काही वाटणार नाही. फक्त थोडी सर्दी झाली, असे वाटेल, असे वक्तव्य केले होते. मार्चमध्ये अमेरिकेच्या अधिकृत दौ-यावर आलेल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांमधील 20हून अधिक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर स्वत:ला कोरोना झाला, की नाही हे सांगण्यासाठी बोल्सोनारो यांच्यावरील दबाव वाढला. ब्रासिलिया येथील लष्कराच्या मुख्यालयाबाहेरील टाळेबंदी संपुष्टात आणावी, अशी मागणी बोल्सोनारो यांनी केली.

त्यावेळी भाषण देताना त्यांना खोकला आला होता. ज्यांनी बदल हवा, म्हणून बोल्सोनारो यांना मतदान केले, त्यांनाही आता आपल्या कृतीचा पश्चाताप होतो आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले, असे अनेकांना वाटते. या महिन्याच्या सुरुवातीला 60 टक्के लोकांना घरात थांबावे असे वाटत होते, ते प्रमाण आता 52 टक्के इतके झाले आहे. बोल्सोनारोच कोरोनामुळे होणा-या मृत्यूबद्दल बेफिकिरीने बोलत असल्यामुळे व्यावसायिक तसे बोलायला लागले, तर त्यांना दोष कसा देणार? आता कोरोनामुळे पाच हजार जण मरतील आणि आपण ते टाळू शकणार नाही. आपण सगळेच बंद करू शकत नाही. आपण शत्रूपासून लपू शकतो, कामापासून नाही,” असे एका व्यावसायिकाने सांगितले.

बोल्सोनारो यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ट्रम्प हेच बेजबाबदार आणि बेफिकीर असताना त्यांनी बोल्सोनारो यांना सल्ला  द्यावा, यासारखा दुसरा विनोद नाही. ब्राझीलमध्ये कोरोनाचे खूप जास्त रुग्ण आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष माझे खूप चांगले मित्र आहेत; पण सध्या ते अतिशय बिकट परिस्थितीत आहेत, असे ते म्हणाले. काही तज्ज्ञांच्या मते, ब्राझीलमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी दाखवली जात आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दर 2.8 टक्के इतका आहे आणि हा इतर 48 देशांपेक्षा अधिक आहे.

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसमोरील राजकीय अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी फेडरल पोलिसांच्या देखरेखीसाठी अलेक्झांड्रे रामागेम यांची नेमणूक केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने रोखली आहे. रामागेम हे बोल्सोनारो यांचे मित्र आहेत. सध्या रामागेम हे बनावट बातम्या पसरवण्याच्या एका योजनेच्या आरोपाअंतर्गत त्यांचा मुलगा कार्लोस याची चौकशी करत आहेत. याच वादामुळे न्यायमूर्ती सर्जिओ मोरो यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो कामात राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही परिस्थिती असताना कोरोनाकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here