Aurangabad : रेल्वे अपघातात १६ परप्रांतीय मजुराचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

0
  • पायलटने प्रयत्न करूनही अपघात टाळण्याला अपयश,

  • मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री 

औरंगाबाद:  औरंगाबादजवळच्या बदनापूर-करमाड स्थानकादरम्यान आज पहाटे मालगाडीखाली चिरडून १६ स्थलांतरित  मजुरांचा मृत्यू झाला. तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असून  मजुरांच्या भयंकर अपघातामुळं संपूर्ण देश हेलावून गेला आहे. ‘हा अपघात टाळण्याचा प्रयत्न लोको पायलटनं केला होता. मात्र, त्यात त्याला यश आलं नाही,’ असं रेल्वे मंत्रालयाने अपघानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेले हे मजूर मध्य प्रदेशातील आपल्या गावी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करतानाच चौकशीचे आदेशही दिले आहे.

दुसरीकडं रेल्वे मंत्रालयानं एक ट्विट करून घटनेची माहिती दिली आहे. ‘सकाळच्या सुमारास काही माणसं रेल्वे रुळांवर असल्याचं लोको पायलटच्या लक्षात आलं. प्रसंगावधान राखून त्यानं गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही आणि गाडीनं मजुरांना धडक दिली,’ असं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती देखील रेल्वे खात्यानं दिली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसंच, जखमींवरील उपचाराची जबाबदारीही सरकार घेईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here