Ahmednagar: मद्यपींचा आनंद गगनात मावेना… जिल्ह्यातील दारूची दुकाने उद्या उघडणार; व्यापारी बाजारपेठा मात्र बंदच..!

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर : शहर व जिल्ह्यातील दारूची दुकाने उद्या (मंगळवार) पासून सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दिला; परंतु परमिट रूमसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ सुरू करण्यासाठी आपापल्या लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा केला मात्र उपयोग झाला नाही. ग्रामीण भागातील तसेच शहरातील बाजारपेठा सोडून लोक वसाहतीतील दुकाने सुरू करण्यास मात्र सोशल डिस्टनसिंगच्या अटीवर मान्यता दिली आहे.

जिल्ह्यात दारूची दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहेत. त्यासाठी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगरचे अधीक्षक पराग नवलकर यांनी आज (दि.4) सायंकाळी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

लॉक डाउन घोषित झाल्यापासून दारूविक्री बंद होती. त्यामुळे विदेशी ‘स्टॉक’ संपल्यानंतर अनेक महाभागांनी ‘गावठी’ला पसंती दिली. मागणी वाढल्याने गावठीचा दहाचा भाव चाळीसवर गेला. श्रीरामपूर शहराच्या पश्चिमेला एमआयडीसी व सूतगिरणी परिसरात रेल्वेच्या कडेला दोन-पाच एकरात मोठा अड्डा तयार झाला होता. गोंधवणी, शिरसगाव परिसरातही तीच स्थिती होती. काही नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सकाळ-संध्याकाळ सुरू राहणारे दारुअड्डे दिवसभर सुरू राहायला लागले, त्यामुळे नागरिक काय समजायचे ते समजले!

श्रीरामपूर : सूतगिरणी परिसरात रेल्वे लाईनच्या कडेला मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या कॅरीबॅग, पाणी-सोड्याच्या बाटल्या व चकण्याच्या रिकाम्या पुड्यांनी मैदान फुलून आले आहे.

19 मार्चपासून बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी पुरते हैराण झाले आहेत. हातावर पोट असलेले छोटे मोठे व्यावसायिक व करगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांनी स्थानिक शिवसेना कार्यकर्ते व नेत्यांच्या माध्यमातून खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. खासदार लोखंडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे लॉक डाउन मधून शिथिलता देण्याची तसेच बाजारपेठेतील व्यापार सामाजिक अंतर पाळण्याच्या अटीवर सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत तशी सवलत देण्याबाबत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आदेश दिले नाहीत.

पोलीस बंदोबस्तात होणार दारूविक्री?

दरम्यान, दारू विक्रेत्यांनी नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाकडे प्रत्येक दारू दुकानासाठी दोन पोलिसांचे संरक्षण मागितले, त्यानुसार उद्यापासून पोलीस संरक्षणात दारूविक्री सुरू होणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here