Shrirampur : मुठेवाडगांव येथे घरगुती वादातून जावयाचा खून; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

माळवाडगांव – श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथे सासरा व जावयाच्या वादातून जावयाचा खून करण्यात आला. सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरुन झालेला वाद विकोपाला जाऊन सासर्‍याने मित्राच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा काटा काढला. लोखंडी पाइप व दगडाने मारहाण करून जावयाचा खून केला. घटना काल गुरुवारी (दि.७) रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली. 

मयूर आकाश काळे (वय-२८) (रा.मूळ कर्जत हल्ली रा.मुठेवाडगाव ता.श्रीरामपूर), असे मृत जावयाचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिसांनी चौघा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (दि.७) रात्री ९ च्या सुमारास सचिन काळे (रा.मुठेवाडगाव) संदीप काळे, सुरज काळे (रा.भेंडाळा ता.गंगापूर) व बुंदी भोसले (रा.मिरजगाव ता.कर्जत) हे मयूर यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी मयूर व त्याची पत्नी मोनिका (वय-२३) यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. त्यावेळी हे सर्व दारूच्या नशेत होते. वाद विकोपाला गेल्यानंतर सचिन यांनी लोखंडी पाईप व दगडाने मयुरला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्यांनी मोनिकाला ही मारहाण केली. त्यात तीही जखमी झाली.

मयूरचा भाऊ तैमुर काळे हा वाद सोडविण्यासाठी तेथे गेला असता आरोपींनी त्याचे घर पेटवून दिले. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
मोनिका काळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी सचिन काळे, संदीप काळे, सुरज काळे, बुंदी भोसले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. परंतु पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांना एन.डी.पवार यांच्या पथकाने तातडीने त्यांचा शोध घेऊन सचिन, सुरज व बुंदी यांना सकाळी अटक केली असून आरोपी संदीप हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here