Editorial : लाईफ गूड नव्हे, लाईफ बॅड

राष्ट्र सह्याद्री | 9 मे

दक्षिण कोरियातील एलजी कंपनी ही इलेक्ट्रानिक्स क्षेत्रात आहे, हे अनेकांना माहिती आहे; परंतु विशाखापट्टणमच्या घटनेनंतर ही कंपनी अन्य क्षेत्रातही कार्यरत असल्याचे समजले असेल. एलजीचा अर्थ अनेकांना माहिती नसेल. कंपनीचे हे नाव लाईफ गूड या इंग्रजी दोन शब्दांतील अक्षरे घेऊन त्याचे केलेले लघुरूप आहे. याच कंपनीच्या विशाखापट्टणम  येथील प्रकल्पात वायू गळती होऊन १३ लोकांचा जीव गेल्याने ही कंपनी एलजी नसून एलबी (लाईफ बॅड) असल्याचा अनुभव स्थानिक नागरिकांना आला आहे. विशाखापट्टमणच्या घटनेने भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीच्या ३५ वर्षांपूर्वीच्या वायू गळतीच्या घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. तीन डिसेंबर १९८४ ची काळरात्र भोपाळकर अजूनही विसरलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन भोपाळवासीयांसाठी अवघी ७१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. त्यातून १५ बळी गेलेले १५ हजार नागरिक आणि एक लाख लोकांच्या वाट्याला किती मदत आली असेल, याचा विचार केला, तरी अशा तुटपुंज्या मदतीतून काहीच साध्य होत नाही. गेलेले जीव मदतीने परत येत नाहीत. सरकारी आकड्यांपेक्षाही मृतांचा आणि वायूबाधितांचा आकडा फार मोठा होता, असे माध्यमातून जाहीर झाले होते. मदतीच्या बदल्यात कंपनीविरोधातील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले होते. 

जगाच्या औद्योगिक इतिहासातली ही सर्वांत मोठी दुर्घटना होती. भोपाळमधील घटनेनंतरही देशात वायू गळतीच्या अनेक घटना घडल्या. मुंबईत शीवमधील क्लोरिन वायूची गळती, केंद्र सरकारच्याच पेट्रोलियम कंपनीत झालेली वायूगळती, तारापूर परिसरात अनेकदा झालेली वायूगळती, डोंबिवलीत हिरवा पाऊस, नगर जिल्ह्यातील कारखान्यांत बायोगॅस प्रकल्पात कामगारांचा झालेला मृत्यू अशा कितीतरी घटना सांगता येतील; परंतु त्यातून आपत्ती व्यवस्थापनाचे आपण काही धडे घेतले का, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असेच येते. भोपाळ आणि विशाखापट्टणम येथील दोन्ही घटनांत एक साम्य आहे, ते म्हणजे दोन्ही पहाटेच घडल्या. गाढ झोपेत असलेल्यांना पुन्हा श्वास घेता आला नाही. दोन्ही घटनांतील फरक इतका, की भोपाळची घटना हिवाळ्यात घडली होती. त्यामुळे वायू शहरभर पसरला. युनियन कार्बाईड कंपनी शहराजवळ असल्याने बाधितांची संख्या लाखांत गेली, तर विशाखापट्टणम येथील घटना उन्हाळ्यात घडल्याने वायूगळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरापुरता मर्यादित राहिला आणि तिथे लोकसंख्येची घनता कमी असल्याने जीवितहानी कमी झाली.

युनियन कार्बाईड प्रकल्पातील विषारी मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आल्याने हे घडले. रासायनिक प्रक्रियेमुळे टाकीत दाब निर्माण झाला आणि ही टाकी उघडली. त्यातून वायू गळती झाली. केवळ तीन मिनिटांमध्ये या विषारी वायूने हजारो लोकांचा बळी घेतला. धोक्याची सूचना देण्यासाठी कंपनीत असलेला भोंगाही अनेक तास वाजलाच नाही. अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याने जे लोक हॉस्पिटलमध्ये पोचले, त्यांच्यावर नेमके कोणते उपचार करायचे, याची कल्पना डॉक्टरांना नव्हती. एका अंदाजानुसार पहिल्या दोन दिवसांत सुमारे 50 हजार लोकांवर उपचार करण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी गावात एका रसायनाच्या कंपनीत बॉयलरचे स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १५ पेक्षा अधिक कामगारांचा जीव गेला तर ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

वायू गळती, बाॅयलरचे स्फोट आदींमुळे दरवर्षी कितीतरी बळी जात असतात. विशाखापट्टणम शहराजवळच्या एका रासायनिक प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक जणांना वायूबाधा झाली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना घडली. या वायू गळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरात जाणवला. दाट लोकवस्तीच्या भागात ही कंपनी असती, तर वायू गळतीच्या बळींची संख्या कितीतरी पटीने वाढली असती. 

या परिसरातील लोकांना डोळ्यांमध्ये जळजळ होत असून श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांनी या ठिकाणापासून दूर जायला सुरुवात केली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना जास्त त्रास होत आहे. या वायू गळती प्रकरणानंतर मन विचलित करणारे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. काही जण गाडीवरून जाताना अस्वस्थ वाटत असल्यामुळे खाली पडले आहेत, तर काही जण रस्त्यात उभे असताना बेशुद्ध पडले आहेत. किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत.

वायू गळतीची माहिती मिळताच आर. आर. वेंकटापूरम्, वेंकटापूरम्, पद्मनाभपूरम्, बीसी कॉलनी आणि कंपारापालेमच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काही जण हा वायू नाकावाटे शरीरात गेल्यामुळे बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी एलजी पॉलिमर्स कंपनीत झालेल्या या वायू गळतीची माहिती घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हा रासायनिक प्रकल्प एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. 1961 मध्ये सुरू झालेले येथील प्रकल्प हिंदुस्थान पॉलिमर्सच्या मालकीचे होते. 1997 मध्ये दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे याची मालकी आली. भोपाळचा प्रकल्प अमेरिकेच्या कंपनीचा होता, तर विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे. टाळेबंदीनंतर कारखान्यात पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गाढ झोपेत असताना गुरुवारी पहाटे तीन वाजता वायू गळती सुरू झाली. अनेकांना याबाबत लगेच लक्षात आले नाही; पण हळूहळू वायू गळतीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली.

स्टायरिनचा प्राथमिक उपयोग हा पॉलिस्टिरिन प्लॅस्टिक आणि रेसिन्स (राळ) बनवण्यासाठी होतो. स्टायरिन वायू हा रंगविरहीत किंवा हलकासा पिवळ्या रंगाचा असतो. हा एक ज्वलनशील वायू  असून त्याचा गोड वास येतो. बेन्झिन आणि इथिलीनपासून या वायूची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोअरिंग, वापरून टेबलवेअर आणि मोल्डेड फर्निचरमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी याचा वापर होतो. हवेतल्या स्टायरिन वायूमुळे डोळे जळजळणे, घशात घरघर, खोकला आणि फुफूस जड होते. हा वायू जास्त प्रमाणात माणसाच्या संपर्कात आला तर त्याला स्टिर्न सिकनेस होतो. यामुळे डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अशक्तपणा, चक्कर येणे, शौचात अनियमितपणा येण्याची लक्षणे आढळतात.

काहीवेळा यामुळे ह्रदयाचे ठोके अनियमित होतात आणि माणूस कोमात जाण्याची शक्यता असते. त्वचा स्टायरिन शोषून घेऊ शकते. अशी व्यक्ती जर अनेकांच्या संपर्कात आली, तर केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करते तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशाच प्रकारचा त्रास स्टायरिन वायू शरीरात गेल्यावरही होऊ शकतो. त्वचा आणि डोळे जळजळ करतात. स्टायरिनमुळे लुकेमिआ आणि लिम्फोमा होण्याचा धोका वाढतो असे साथीच्या रोगाचे संशोधन सांगते. स्टायरिन लवकर आग पकडते आणि आग लागल्यावर त्यातून विषारी वायू निघतो.

या वायुगळतीच्या घटनेने अन्य शहरांना सावध केले आहे. विशेषत: महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास कल्याण, डोंबिवली, पालघर, तारापूर, बोईसर, नागोठाणे, रोहा या शहरांतील रासायनिक कंपन्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. या सर्वच कंपन्यांना आतापासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजनांची चाचपणी करावी लागणार आहे. ही पार्श्वभूमी पाहिली, तर स्टायरिन वायूमुळे या भागातील लोकांना किती संकटांना सामोरे जावे लागेल, याची कल्पना येऊ शकते.

1 COMMENT

  1. I used to be suggested this web site by means of my cousin. I am no longer certain whether or not this put up is written through him as nobody else understand such targeted about my difficulty. You are wonderful! Thanks!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here