Beed : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात शेतक-यांनी सतर्क रहावे – सुपेकर

प्रतिनिधी | कडा | राष्ट्र सह्याद्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणा-या खरीप हंगामात शेतक-यांनी सतर्क रहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

याबाबत कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुपेकर यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या सावटाखाली आपण खरीप हंगामाच्या उंबरठयावर उभे आहोत. कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम शेती शेतकरी, अर्थकारण यावर दिसतील यात शंका नाही. शेतक-यांनी येत्या खरीप हंगामात एक पीक ऐवजी बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा. कडधान्य, तृणधान्य, गळितधान्य, चारापिके व भाजीपाला पिके यांचा समावेश पीक नियोजनात करावा. कमी खर्चाच्या  तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. कडधान्ये म्हणजेच तूर, उडीद, मुग या पेरणी करिता सुधारित जातीचे बियाणे वापरावे. बाजरी व मका या पिकांचे सुधारीत व संकरीत वाण वापरावेत.

ज्या शेतक-यांकडे स्वतःच्या शेतातील पिकवलेल्या तूर, मूग, उडीद व सोयाबीनचे बियाणे असेल त्यांनी स्वच्छ करुन उगवण क्षमता तपासून उत्तम उगवण क्षमता असणारे बियाणे बीजप्रक्रिया करून पेरावे. मिश्र व आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा. पुरेसी ओल झाल्यानंतर पेरणी करावी. पिकांना पेरणी करताना योग्य ती रासायनिक खते पेरणी बरोबर  द्यावित. किडीचे व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने करावे. हुमणी, लष्करीअळी, गुलाबी बोंडअळी या किडीचा जीवणक्रम समजून घेऊन योग्य वेळी कीड व्यवस्थापन उपाय योजावेत. निबोळीचा वापर करून सुरुवातीच्या काळात किडीचे कमी किमतीत व कमी खर्चात व्यवस्थापन करणे शक्‍य आहे.

वेळोवेळी कृषि विद्यापीठे कृषि विभाग, प्रगतशील शेतकरी यांचे प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होणा-या शेती विषयक संदेश आपल्या पीक संगोपनासाठी वापरावेत. शेतातील पिकांच्या कीड व रोग सर्वेक्षणावर भर दयावा व आवश्यकतेनुसार उपाय योजना कराव्यात. कमीत कमी खर्चात पिक घेण्यावर भर दयावा व खरीप हंगामात यशस्वी करावा शेतकरी गट, शेतकरी कंपन्या व कृषि निवौष्ठा विक्रेते यांनी परस्पर समन्वयातून बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या खरेदीस्तव गर्दी न करता बांधावर या निविष्ठा उपल्बध करणेस्तव प्रयत्नशिल रहावे, असे आवाहन सुपेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here