Newasa : तालुकाध्यक्ष माळवदे यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन

नेवासा फाटा प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

काँग्रेस जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांच्याकडे मागणी         

नेवासा तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांच्या नवीन चांदगाव येथील राहत्या घराची नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्यासह अन्य चार पोलीस कर्मचाऱ्यांनी (दि १९ एप्रिल २०२०) सायंकाळी ८:00 वाजण्याच्या सुमारास कुठलेही ठोस कारण नसताना, कुठलीही अधिकृत परवानगी तसेच सर्च आदेश नसताना राहत्या घराची झाडाझडती घेतली.
माळवदे यांची पार्श्वभूमी अवैध धंद्याची किंवा गुन्हेगारीची नसताना हा गैरप्रकार घडलेला असल्याने या प्रकाराचा जिल्हा काँग्रेसकडून तीव्र निषेध नोंदवला. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे पोलिस अधीक्षक यांना सांगण्यात आले. या पोलीस पथकातील काही कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही असेच गैरप्रकार केल्याचा ठपका आहे. त्यांच्यावर कारवाईचे आदेश असल्याचे यानिमित्ताने या निवेदनाद्वारे सांगण्यात आले. अशा गैरप्रकारांतून समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे व विरोधकांकडून सुपारी घेऊन कुटील कारस्थान यामागे असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात आला.
याशिवाय राज्याचे काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील सदर घटनेची माहिती देऊन या घटनेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली. याशिवाय संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाईस टाळाटाळ झाल्यास जिल्ह्याभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी जिल्ह्या काँग्रेस कमिटी(एस सी) जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस एस सी विभाग या घटनेचा निषेध करत असून कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक यांना तसे निवेदन दिले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी माळवदे हे देखिल उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here