Shrigonda : सीइटीच्या परीक्षा जिल्ह्यासोबत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही घ्याव्यात – अक्षय अनभुले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – सामाईक प्रवेश परीक्षेबाबत (सीइटी) लवकरात लवकर व योग्य निर्णय व्हावा,आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ठिकाणासोबत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही या सीइटीच्या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय अनभुले यांनी राज्य सरकारकडे निवेदन ई-मेल ने पाठवून केली आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली आहे. यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ही मागणी आधीही मंत्रिमंडळ बैठकीत मांडली असून आताही या मागणीबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास दिला.

सीईटीमुळे जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रावर संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी येतात आणि त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या केंद्रावरील मोठी गर्दी होणे कोरोनाच्या दृष्टीने योग्य नाही. होणाऱ्या गर्दीमुळे या जिल्ह्याच्या केंद्रावर सामाजिक अंतर पाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. तसेच जिल्ह्याच्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात ताण येईल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात देखील मोठ्या गर्दीची भीती राहील.
हे सर्व टाळण्यासाठी जिल्ह्याच्या परीक्षा केंद्राबरोबर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ह्या सीइटीच्या परीक्षा केंद्रांना परवानगी देऊन तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात याव्यात.यामुळे परीक्षा केंद्रांवर जास्त गर्दी होणार नाही आणि सोशल डीस्टँसिंगचे ही पालन करता येईल आणि कमी गर्दीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीही राहणार नाही. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
तसेच अक्षय अनभुले यांनी अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करण्याचा जो विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. त्याबद्दल राज्य सरकारचे आणि उच व तंत्रशिक्षण मंत्री व राज्यमंत्री यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here