कोरोनाच्या लढाईतील एक “क्षीर” सागर…

0

सुपूत्रांनी जपला वडीलांचा देशभक्तीचा वारसा

Rashtra Sahyadri Special Story

राजेंद्र जैन / कडा:

अख्ख जग कोरोना सारख्या महामारीचा नायनाट करण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावत असतानाच, भारतीय लष्कारातील वडीलांचा देशसेवेचा वारसा एकाच क्षीरसागर कुटुंबातील पोलिस दलात कार्यरत असलेले तिन्ही बंधू जोपासतात. आपलं घरदार सोडून या राष्ट्रीय आपत्तीत स्वत:ला झोकून देऊन कोरोनाच्या युध्दात सामना करीत आहेत. त्यांचं सामाजिक योगदान पाहून माजी सैनिक असलेल्या वडीलांची मान देखील अभिमानाने उंचावली आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवाशी असलेले सामान्य कुटुंबातील अर्जून दादाराव क्षीरसागर हे भारतीय लष्करातील एक माजी सैनिक आहेत. बावीस वर्षे त्यांनी भारतीय लष्कारात एक सैनिक म्हणून देशाची अखंड सेवा केलेली आहे. विशेष म्हणजे क्षीरसागर यांच्या कुटूंबातील काहीजण आजही देशसेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे या कुटुंबाच्या रक्तातच देशभक्ती ठासून भरलेली आहे.

माजी सैनिक अर्जून क्षीरसागर लष्करी सेवेतून निवृत झाल्यानंतर आपल्या कौटुंबिक परिस्थितीवर मात करुन तिन्हीही मुलांना उच्च शिक्षित केले. संस्काराबरोबर मुलांना देशभक्तीचे धडे दिले. पोटापूरती नोकरी न करता मुलांच्या पाठीशी सामाजिक कर्तव्याची शिदोरी बांधली. याच सुसंस्कारात वाढलेली एका सैनिकाची मुले कुणाच्या फुटक्या कवडीला हात न लावता आजही पोलिस दलात इमानदारीने विविध पदावर कार्यरत आहेत. प्रशांत, विशाल आणि प्रविण ही तिन्हीही रत्न कोरोना महामारीच्या संकटात आपलं घरदार सोडून आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून कोरोनाच्या युध्दात रस्त्यावर उतरुन परिस्थितीचा सामना करताना दिसत आहेत.

देशभक्त वडीलांनी घालून दिलेले संस्कार अन देशभक्तीचा वारसा तिघेजण भारताचा सच्चा सैनिक म्हणून प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. त्यामुळे “खाकी” तील बंधुचं सामाजिक योगदान वर्दीतील त्या अधिकारी, कर्मचा-यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. आपल्या सुपूत्राचं कर्तृत्व पाहून एका माजी सैनिकाची मान देखील अभिमानाने उंचावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here