Rahuri : नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी देवळाली प्रवरा नगराध्यक्षांवर कारवाई करा – अजित कदम

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले असताना देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लॉकडाऊन चालू असताना नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी शासकीय कामात हस्तक्षेप करत नागरिकांवर दहशत निर्माण करून हुकूमशाही गाजवली आहे. याची चौकशी करून संबंधित नगराध्यक्ष व हुकमशाही गाजविण्यात सहभाग असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अजित कदम यांनी केली आहे.

देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देऊन देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत उद्भवलेल्या विविध समस्यांबाबत चौकशीची मागणी करण्यात आली. यावेळी उद्योजक गणेश भांड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, शिवसेना देवळाली शहरप्रमुख सुनील कराळे, राहुरी फॅक्टरी शहरप्रमुख विजय गव्हाणे, नगरसेवक शैलेंद्र कदम, रफिक शेख, शरीफ शेख, प्रमोद बर्डे, रावसाहेब मुसमाडे, गंगाधर गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित कदम यांनी सांगितले की, देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत ४५ दिवसापूर्वी लॉकडाऊन चालू करण्यात आले होते. शहराची रचना २० टक्के लोक गावठाणात तर ८० टक्के वाड्यावस्त्यांवर राहतात. प्रत्येक नागरिकाला वाड्यावस्त्यावरून गावठाणात संपर्क करून औषधे, रुग्णालये, बँका, किराणा, दूध, पीठ गिरणी आदी ठिकाणी व्यवहार करण्यासाठी गावाशी संपर्क ठेवावा लागतो. नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी अनधिकृतरित्या गल्ली बोळात व गावाशी संपर्क जोडणाऱ्या रस्त्यांवर बांबू लावून नाकाबंदी केली. प्रत्येक नागरिकास गावात येण्यास सक्त मनाई करण्यात आली. अत्यावश्यक सेवांपासून वंचित करण्यात आले. मात्र, मर्जीतील लोकांना लॉकडाऊनमधून शिथिलता देऊन नागरिकांत दुजाभावाची वागणूक दिली आहे.

नगराध्यक्ष कदम यांनी स्वमालकीच्या चारचाकी वाहनास अनाधिकृत सायरन बसवून सायरन वाजवून नागरिकांवर दहशत निर्माण केली. लॉकडाऊन काळात राजकीय द्वेष मनात ठेवून शहरातील दूध संकलन करणाऱ्या संस्थेच्या व स्वता:च्या पक्षाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करून दूध संकलन केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न केला. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतून परराज्यातील मजूर जात असताना गुहा-देवळाली प्रवरा शिवेजवळील हॉटेलात पाणी पिण्यासाठी थांबले असताना नगराध्यक्षच्या कार्यकर्त्यांनी ४४ मजुरांना जबर मारहाण करून जखमी केले. त्या संदर्भात व्हिडीओ व फोटो व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यानुसार त्या राजकीय गुंडावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

देवळाली प्रवरा येथील अनाधिकृत बंद केलेल्या रस्त्यांवर नगराध्यक्षाच्या आदेशानुसार मुजोर कर्मचाऱ्याने प्रसूतीसाठी चाललेल्या अल्पसंख्याक कुटुंबातील महिलेला नाकाबंदीवर थांबवून जाण्यास अडवणूक केली. त्यावेळी सदर महिलेचे बाळ उदरातून अर्धवट बाहेर आलेले असताना मुजोर कर्मचाऱ्याला दया आली नाही. अखेर त्या महिलेच्या पित्याने मुजोर कर्मचाऱ्याचे पाय धरले तरीही त्या कर्मचाऱ्याने त्या महिलेस वैद्यकीय सुविधेपासून वंचित ठेवले. अखेर त्या पित्याने आपल्या मुलीचे बाळ वाचविण्यासाठी अर्धवट अवस्थेत बाहेर आलेल्या बाळासह १२ किलोमीटर प्रवास करून प्रसूतीसाठी खासगी दवाखान्यात दाखल करत असताना रुग्णालयाच्या पायरीवर जन्म घेतला. त्या मुजोर कर्मचाऱ्यार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

स्वस्त धान्य दुकानाबाबत धान्य वितरणात काळा बाजार झाला असून त्याची माहिती मिळावी. राजकीय द्वेषाने होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची माहिती मिळावी. जिल्हाधिकारी यांच्या नियमानुसार दुकाने नागरिकांसाठी तात्काळ खुली करण्यात यावी. नागरिकांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीपाला विक्रीस नियमानुसार परवानगी मिळावी आदी मागण्या अजित कदम यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केल्या आहेत.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा धार्मिक ठिकाणी धुडगूस

लॉकडाऊन काळात नगराध्यक्ष कदम यांच्या जवळचा व एका संस्थेचा संचालक सुधीर टिक्कल व माजी नगरसेवक अजित चव्हाण यांनी मद्यप्राशन करून नगराध्यक्ष सत्यजीत कदमसह एका मुस्लिम समाजाच्या धार्मिक दर्ग्यात जाऊन धुडगूस घातला. याबाबत दर्ग्याचे प्रमुख अकिलबाबा पटेल यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली असता जुजबी गुन्हा दाखल करून पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी उठबशा काढण्याची शिक्षा दिली. या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीयांच्या वतीने करण्यात आली.

मुख्याधिकारी बनले कठपुतली

देवळाली प्रवरा नगरपालिकेत मुख्याधिकारी अजित निकत यांनी लॉकडाऊन काळात कोणताही निर्णय घेताना नगरपालिकेच्या त्या तीन कर्मचाऱ्यांच्या निर्णयानुसार लॉगडाऊनचा कारभार मुख्याधिकारी राबवित असल्याने मुख्याधिकारी त्या तीन कर्मचाऱ्यांच्या हातातील कठपुतली झाल्याने ते तीन कर्मचारी आपल्याला पाहिजे तोच निर्णय घेऊन मुख्याधिकारी यांना कठपुतली बनवले आहे. तर नगरपालिकेचा दुसरा एक कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेला नाकाबंदी ठिकाणी मुजोरी करीत असताना मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही न पहिल्यासारखे केले आहे. तर दुसऱ्या नाकाबंदी ठिकाणी २४ तास दोन कर्मचारी मद्यपानाच्या धुंदीत राहून नागरिकांना वेठीस धरत आहे. याबाबत अनेकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्या मद्यधुंद कर्मचाऱ्यांना कारवाई न करता पाठीशी घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here