Karjat : लॉकडाऊन काळात घरातून सर्वसामान्य लोकांना स्केच साकारून भेट देणारा अवलिया ‘जाकीर शेख’

0

डॉ. अफरोज खान पठाण  | राष्ट्र सह्याद्री दि १०

कर्जत – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन पुकारल्याने अनेकांना आपल्या व्यवसायाला लॉक करायला लागले आहे. व्यवसायात गुतल्याने अनेकांना या काळात घरात राहणे सहजासहजी पचनी पडणारे नव्हते. अनेकांनी आपल्या व्यवसाय वृद्धी आणि विकासासाठी सुप्त गुणाना मुरड घातली होती. ती या लॉकडाऊन काळात चांगलीच बहरली असल्याचे उदाहरण समोर येत आहे. असाच एक अवलिया कर्जत शहरात आपल्या पेन्सिल आणि रंगांनी स्केच तयार करीत लोकांची वाहवा मिळवत आहे त्याचे नाव आहे जाकीर शेख. 
जाकीर शेख हे कर्जत शहरातील मध्यमवर्गीय कुटूंबाचा कर्ता पुरुष. कोरोना लॉकडाऊन काळात दुकान आणि बाहेरील काम बंद असल्याने त्यांनी घरातच आपल्या कलेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू ठेवला आहे. फेसबुकवर कोणा जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असू की कोणी सहजच फोटो अपलोड केला असलेला जाकीर यांच्या निदर्शनास आला की त्याच्यातील पेंटर आणि आर्ट टीचर जागृत होतो. मग हुबेहूब त्याचा व्हाटसअप अथवा फेसबुक प्रोफाइल फोटो पेन्सिल साह्याने साकारत त्याला अनोखी भेट देण्याचा अभिनव फंडा राबविला आहे.
जाकीर लहानपणापासूनच संघर्षमय जीवन करीत आपली कला जोपासण्याचा प्रयत्न करणारा युवक. शालेय काळात विद्यार्थी दशेत असताना सातवीपासूनच पेंटींग क्षेत्रात विशेष रस होता. शाळेत चित्रकला विषयात हुबेहूब चित्र साकारत शिक्षकांची वाहवा मिळवत होता. त्यातच करियर करायचे असा चंग बांधला होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षणासाठी पैसा नसल्याने बारावीनंतर दोन वर्ष एटीडी केले. त्यांनतर कलाक्षेत्रात चार वर्षे डिप्लोमा (जीडी आर्ट) करीत कलाक्षेत्रात नोकरीच्या शोधात बाहेर पडला. मात्र, मेहनतीला नशिबाची साथ मिळाली नाही. तसेच नोकरीला कोणाची शिफारस आणि जवळ पैसा नसल्याने त्याला मुरड घालावी लागली.
मात्र, हिम्मत न हारता आपल्या कलेची मेहनत वाया जाणार नाही, असा आत्मविश्वास मनाशी बांधत कर्जत शहरात आणि तालुका परिसरात साइन बोर्ड, रेडियम द्वारे नाव – वाहनांची नंबर प्लेट बनविणे, हाऊस पेंटिंग आणि शालेय भिंतीना कलात्मक, चित्रात्मक रेखाटन करीत लोकांचे लक्ष वेधू लागले. अल्प वेळात उत्तम – उत्तम सुंदर चित्र हुबेहूब रेखाटत निर्जीव चित्रात जिवंतपणा निर्माण करणारा हा युवक लोकांना हवाहवासा वाटू लागला. पुढे त्याला साथ देत आर्ट पेंटींग, स्केचिंग, अॅक्रॅलीक कलर पेंटींग साकारत नाव मिळवू लागले. हौशी लोकांची वर्दळ जाकीर यांच्याकडे येऊ लागल्याने त्यांना अजून हुरूप आला आणि लोकांच्या फरमाइशवरून ते चित्र, स्केच तयार करू लागले. लॉकडाऊन काळात या अवलियाने जवळपास दररोज आपल्या जवळचे मित्र आणि वाढदिवस असणाऱ्या अनोळखी व्यक्तीला स्केच बहाल करण्याचा सुखद अनुभव अंगिकारला आहे.
शेख यांचा पेंटींग बरोबर कराटे कोचचा प्रवास

जाकीर यांनी पेंटींग बरोबरच आठवी इय्यतेपासून त्यांचे कराटे गुरू एस मैनुद्दीन यांच्याकडे चार वर्षे कराटेची प्रॅक्टिस करीत ब्लॅक बेल्ट संपादन केला होता. मागील वर्षीच त्यांनी आयडियल कराटे किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रचे संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा डॅन ब्लॅक बेल्ट डिग्री मिळवत सध्या ते कर्जत शहर आणि तालुक्यात कराटे क्लास घेत कोचची भूमिका सुद्धा पार पाडत आहे. 

पैशापेक्षा कलेचा आनंद मोठा – जाकीर शेख

आपल्या सोळा- सतरा वर्षाच्या कार्यकाळात आजपर्यंत अनेक हौशी आणि आर्ट कलेवर प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी आपल्याकडून स्केच आणि चित्रे काढून घेतली आहे. यावेळी अनेक लोक मोबदला देताना त्याची रक्कम आपल्याला विचारतात मात्र आपण आपल्या कलेला कधीच पैशाशी जोडले नाही. कलाप्रेमी त्यांना वाटेल ती रक्कम खिशात टाकतात. मात्र, आपल्याला त्या पैशांपेक्षा त्याला साकारण्यास योग्य न्याय दिला ते अधिक महत्वाचे वाटते, असे अभिमानाने सांगतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here