Beed : आष्टीत पोलीस कर्मचा-यासह होमगार्डला मारहाण

3
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
कडा – तोंडाला मास्क न बांधता शहरातील बाजारपेठेत प्रवेश करण्यास रोखल्यानंतर दोन भावांनी मिळून दोन पोलीस कर्मचारी व होमगार्डवर हल्ला चढवत काठीने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. आष्टी शहरातील कमान वेशीजवळ हा प्रकार घडला. याबाबत दोघा भावांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवसाआड सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरात यावेळेत होणारी गर्दी लक्षात घेऊन सामाजिक अंतराचे पालन होण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व होमगार्डस नियुक्त केलेले आहेत. आष्टीतील कमान वेशीजवळ पोलिस शिपाई सचिन कोळेकर, रियाज पठाण व होमगार्ड शैलेश वांढरे हे बंदोबस्तावर होते.

यावेळी शांतीनाथ राजाराम फुंदे (वय 40 वर्षे) व शरद राजाराम फुंदे (वय 45 वर्षे, दोघे रा. शेकापूर हल्ली मुक्काम पुणे) हे दोघे भाऊ बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आले. तोंडाला मास्क न बांधता ते बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असल्याने कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग मनात धरून या दोघांनी सचिन कोळेकर, रियाज पठाण व शैलेश वांढरे यांना काठीच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत वरील तिघे जण जखमी झाले. पोलिस शिपाई सचिन कोळेकर यांच्या डोक्याला काठीचा जोराचा मार लागल्याने त्यांना उपचारांसाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. याबाबत रियाज पठाण यांनी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शांतीनाथ फुंदे व शरद फुंदे या दोघा भावांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा

तसेच राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांचा धाक संपला ?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असताना देखील आष्टी, कड्यासह अनेक गावांमध्ये अवैध धंदे तेजित आहेत. दिवसा दारु, गुटख्याची सर्रास विक्री चालू आहे. चोरी, घरफोड्या वाढल्यात. हे प्रकार कमी होत नाही तोच, आता तर भरदिवसा पोलिसांच्या अंगावर हात टाकला जात असेल तर आष्टीत खाकीचा धाक संपला की काय, असा थेट प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here