Newasa : पोलीस अधिकाऱ्याच्या मातेने दिला कवितेतून ‘गो कोरोना’चा नारा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – “कोरोना व्हायरस काही केले तरी संपेना, वाढत्या संख्येमुळे पोलीस-डॉक्टर प्रशासनाला चैन पडेना । माणसे करीत नाहीत व्यवस्थित नियमांचे पालन, कोरोना वाढविण्यास स्वतःच बनतात कारण” अशी खंत प्रतिभा जवळे यांनी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करून ‘गो कोरोना’चा नारा दिला आहे. 
जवळे यांची ‘कोरोना’ या आजारावरील हृदयस्पर्शी कविता समाज माध्यमांवरून चांगलीच फिरू लागली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या शेवगाव उपविभागाचे तरुण तडफदार उपविभागीय पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या त्या मातोश्री आहेत. रविवारी ‘मदर्स डे’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस, डॉक्टर्सच्या वेदनेला कवितेच्या माध्यमातून वाट करून दिली.
पोलीस उपअधीक्षक या जबाबदारीच्या पदावरील आपल्या मुलाची ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लोकांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र सुरू असलेली फरफट पाहून मातृ हृदयातील तळमळच जणू या कवितेच्या माध्यमातून प्रकट झाल्याची जाणीव ती वाचणाऱ्याला झाली नाही तरच नवल. कोरोनाचे गांभीर्य न बाळगणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, “माणसांना आवरता आवरता पोलिसांचा जीव येतो घाईला, आपण मात्र घाई करतो घराबाहेर पडायला, प्रत्येक जण करतो आपल्याच कुटुंबाची काळजी, पोलीस-डॉक्टर प्रशासन करतात लोकांची काळजी” या शब्दात पोलीस आणि डॉक्टरांच्या एकाकी कामाचे विश्लेषण त्यांनी केले आहे. पोलीस, डॉक्टरांनाही कुटुंब असताना त्यांना घरी सोडून लोकांची ते काळजी घेत आहेत, याची किमान लोकांनी जाणीव बाळगावी, अशी माफक अपेक्षा त्यांनी याद्वारे व्यक्त केली आहे.
“लोकांच्या सेवेसाठी, काळजीपोटी त्यांची बदलून जाते काया, भरातीयांनो आता तरी नियमांचे पालन करूया ।” अशी आर्त हाक जवळे यांनी या कवितेच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे. “पोलीस, डॉक्टर प्रशासन  यांना आपण साथ देऊया, आपण आपली काळजी घेऊन कोरोनाला नष्ट करूया, आलेल्या संकटाशी लढा देऊन कोरोना मुक्त होऊया” अशी सहज सोपी पद्धत त्यांनी कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी लोकांना सांगितली आहे. लोकांना कोरोनाच्या दडपणातून मुक्त करण्यासाठी, “कोरोना व इतर रोग बरे करून होऊया छान, पोलीस, डॉक्टर प्रशासन यांना देऊया मान-सन्मान, गो कोरोना-कोरोना गो” अशी हाक जवळे यांनी या कवितेद्वारे दिली आहे.
जवळे यांची ही कविता सर्वांनाच चांगलीच भावली असून पोलीस, डॉक्टर, महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी ती वाचल्यावर भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here