Beed : कडा परिसरात वाढतेय बिबट्याची दहशत ?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कडा – तो, कधी चिक्कूच्या बागेत दिसतो तर कधी नगर-बीड रोडवरील दूध संघाच्या पडक्या इमारतीत. सध्या त्याचाच बोलबाला आहे. पंधरा दिवसांपासून कडा आणि परिसरात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. शिरापूर, टाकळी, शेरी बु, कडा याठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कड्यातही या बिबट्याने काही दिवसांपूर्वी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना दर्शन दिले.
नगर बीड हायवेवर मारुती मंदिरा समोरून नलावडे यांच्या चिकूच्या बागेत बिबट्या जाताना नागरिकांनी पाहिल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या दिवसभर या बागेत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. तर रात्रीच्या वेळी दूध संघाच्या इमारतीत राहत असल्याचे बोलले जात आहे. बिबट्याची जोडी असून या भागात वास्तव्य आहे.
मागील महिन्यामध्ये आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील काही लोकांनी शेतामध्ये बिबटया पाहिला होता. त्यानंतर जवळ असणाऱ्या टाकळी परिसरामध्ये ही आठ दिवसांच्या फरकाने पुन्हा बिबट्या नागरिकांना दिसला. सतत कोणाच्या ना कोणाच्या नजरेत हा बिबट्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मात्र, अद्यापपर्यंत बिबट्याने कुणावर हल्ला केलेला नाही. त्यामुळे वनविभाग त्याच्या शोधात आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता वनरक्षक बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले की,” या भागात बिबट्या आहे हे खरे आहे. मात्र, आम्हाला त्याचे ठसे मिळाले नाहीत. असेल तरी त्याने अद्याप कोणतीही जीवित हानी केली नाही. शिरापूर परिसरात बिबटया असून त्याने रान डुक्कर फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here