तहसीलदार महेंद्र माळी यांची कारवाई;
दबाव झुगारून कारवाई केल्याने नागरिकांनी तहसीलदारांना दिली ‘द रियल हिरो’ उपाधी…
दादा सोनवणे । राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा : शहरातील बँका तसेच सर्वच दुकानात सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याच्या मथळ्याखाली दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’ने बातमी प्रसिद्ध करताच तहसीलदार महेंद्र माळी यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांना बोलावून स्वतः शहरात फिरून तब्बल 15 दुकाने सील केली. या बेधडक कारवाईमुळे तालुक्यात तहसीलदार माळी यांना ‘द रियल हिरो’ असे जनतेमधून संबोधले जाऊ लागले.
राष्ट्र सह्याद्री या वृत्तपत्राने ‘श्रीगोंदा शहरात सोशल डिस्टन्स चा फज्जा’ अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच श्रीगोंदयाचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी नितीन खामकर यांच्यासह नगरपालिका कर्मचारी यांना बोलावून घेतले. कारवाई करण्यासाठी पथकासह अचानक शहरात फिरण्यास सुरवात केली. त्यांनी सुरवातीला तेली गल्ली मधील दारूचे दुकान सत्यम वाईन्स या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या तसेच या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होताना दिसत नव्हते. त्यामुळे तहसीलदार माळी यांनी आदेश पारित करत दुकान सील केले. तसेच शहरातील एक किराणा दुकान, हार्डवेअर चे दुकान, मोबाईल शॉपी, स्वीट होम व ज्वेलरी शॉप अशी एकूण तब्बल 15 दुकाने तहसीलदार महेंद्र माळी यांनी सील केली.
सादर कारवाई केल्यानंतर नियम न पाळणाऱ्या अस्थापनांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. या कारवाईमुळे तहसीलदार महिंद्र माळी यांना ‘द रियल हिरो’ म्हणून शहरात संबोधले जात आहे.