Corona: महसूल प्रशासनाने केली ४० बिहारी कामगारांची व्यवस्था

मिष्टान्न भोजन आणि आदरतिथ्याने कामगार भारावले…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री


कर्जत : कर्जत येथे बिहार येथील कामगार-मजूर अडकले असता त्यांना महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी मिष्टान्न भोजन उपलब्ध करत त्यांची राहण्याची व्यवस्था कर्जत जिल्हा परिषद शाळेत करीत दिलासा दिला. या आदरातिथ्याने कामगार ही भारावले होते.
मंगळवारी सकाळी आपल्या राज्यात जाण्यासाठी बिहार राज्यातील तब्बल ४० कामगार मजुर कर्जत शहरात आपली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आले असता त्यांना कर्जत महसूल प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करीत त्यांना कागदोपत्री रवाना करण्याची जबाबदारी पार पाडली. प्रकिर्या पूर्ण करण्यासाठी वेळ लागत असल्याने त्या सर्वांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करीत त्यांना मोठा आधार दिला.

यावेळी कामगारांना सकाळचा नाष्टा ‘साहेब अल्पोहार’मध्ये, दुपारचे जेवण ‘नमो थाळी’ तर संध्याकाळची व्यवस्था ‘शिवभोजन थाळी’ उपलब्ध करीत त्यांची राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद मुले-मुलींची शाळा या ठिकाणी करण्यात आली. दुपारी त्यांना भोजन वाटप करण्यात आले. यावेळी कर्जत महसूलचे नायब तहसिलदार मनोज भोसेकर, तलाठी सुनील हासबे, आनंद कोकाटे, गणेश सोनवणे, नमो थाळीचे संचालक वैभव शहा, प्रवीण गाडेकर, कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण, मुख्याध्यापक उद्धव थोरात, सागर नलावडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here