Special Story: कोरोनाच्या टाळेबंदीत अखंडीत वीज पुरवठा देणा-या वाघीणी..!

महावितरणच्या उषा जगदाळे, अर्चना लोंढेंनी उमटविला कर्तृत्वाचा ठसा

राजेंद्र जैन । कडा Rashtra Sahyadri…

कोरोनाच्या महामारीत मागील दोन महिन्यापासून सर्वच घरात बसून आहेत. अर्थात घरात थांबायचं म्हटल्या‌वर लाईट तर हवीच ना…पण या विषम परिस्थितीत ग्राहकांना अखंडीत वीज पुरविण्याचं काम सध्या महावितरण कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या उषा जगदाळे अन् अर्चना लोंढे या वाघीणी अविरत कार्य करीत आहेत.

कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात दोन महिन्यांपासून टाळेबंदी आहे. यामुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत दिससरात्र कार्यरत असणारे प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर सर्वच कोरोनाच्या धास्तीने घरात बसून आहेत. तर दुस-या बाजूला वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कर्मचारी अथक परिश्रम घेताना दिसत आहेत. गावाला सुरळीत वीज पुरवठा व्हावा. यासाठी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ उषा जगदाळे, अर्चना लोंढे या दोघी आपापल्या कार्य क्षेत्रात एकही दिवस सुट्टी न घेता अविरत फिल्डवर आहेत. एरव्ही वीज गायब झाली की महावितरण कंपनीच्या नावाने खडे फोडणारे विद्युत पुरवठा सुरळीत केला, म्हणून या कर्मचाऱ्यांचे कधी कौतुक करताना दिसत नाहीत. मात्र सध्याच्या टाळेबंदीत या महिला कर्मचारी कौटूंबिक जबाबदारी पार पाडून कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. इतर सहकारी पुरुष कर्मचा-यासारखं त्यांनी देखील स्वत:ला जनसेवेत अखंड वाहून घेतले आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संकटाचा रणांगणात उतरुन त्या सामना करु लागल्यात. त्यामुळे सामाजिकदृष्टया या दोघींचं योगदान अक्षरश: कौतुकासपात्र ठरत आहे. सध्या उषा जगदाळे आष्टीच्या महावितरण कार्यालयात तर अर्चना लोंढे या बीडमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेेेत. वीज महावितरण सारख्या जोखमीच्या क्षेत्रात दोघींनी स्वकर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे. कोरोनाच्या युध्दात लढणारे योध्दे वैद्यकीय अधिकारी, आरोेग्य कर्मचारी, पोलिस, महसूल, असो की, स्वच्छता कामगार यांच्याप्रमाणेे स्वत:चा जीव धोक्यात घालूूूून या दोन वाघीणी कठीण परिस्थितीत इतरांच्या बरोबरीने उन्हातान्हात लढत आहेत. त्यामुळे वीज महावितरण मधील त्यांचं कर्तृत्व सध्या बीडकरांची मान उंचावणारं ठरत आहे.

हेच आमचं राष्ट्रीय कर्तव्य…
वीज महावितरण सारख्या क्षेत्रात काम करीत असलो तरी आमचीही सामाजिक बांधिलकी ठरते. आम्ही कौटुंबिक जबाबदारी पार पाडून हेच राष्ट्रीय कर्तव्य समजून ग्राहकांना अखंडीत सुरळीत वीज पुरवठा देण्याचे कार्य करीत आहोत.

– उषा जगदाळे, अर्चना लोंढे, वीज तंत्रज्ञ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here