Beed : त्या ‘अठरा’ घरफोड्याचा तपास अद्याप कागदावर ?

चोरांच्या दहशतीने आता नागरिकांची झोप उडाली

आष्टीसह परिसरात म्हणजेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जवळपास अठरा घरफोडयांचा तपास पोलिसांना अद्याप लागलेला नाही. पोलिसांचा दरारा संपुष्टात आल्यामुळे चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून नागरिक चोरांच्या दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षकांची कामगिरी आष्टीकरांसाठी अक्षरश: निराशाजनक ठरू लागली आहे.

मागील दोन महिन्यापूर्वी आष्टीतील विनायक नगर व शेजारच्या दोन अपार्टमेंटमध्ये एका दिवशी चार फ्लॅट तर दोन दिवसाच्या अंतराने आणखी चार फ्लॅटमध्ये भरदुपारी घरात कुणी नसल्याची संधी साधून घरफोडी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्याच भागात रात्रीच्या वेळी घरफोड्या झाल्या. अजूनही चोरीचे सत्र काही थांबलेले नाही, खडकत रस्त्यावरील दोन किराणा दुकाने, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट बँक, हॉटेल संग्राम तसेच मंगरूळ रस्त्यावरील बंधन बँकेमध्ये घरफोडी झाली.

सांगवी आष्टी येथील खेडकर वस्तीवरील घरफोडीत तर दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला. मात्र पोलिस निरीक्षक अन् त्यांचे लाडके कर्मचारी सगळ्या चो-यांच्या घटनांकडे फारसं गांभीर्याने पाहताना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस चोरट्यांचे मनोधैर्य वाढीस लागले आहे. समुद्रातून सुई शोधण्याच्या बढाया मारणा-या आष्टी पोलिसांचा दरारा फक्त अवैद्य धंद्यापुरता मर्यादीत झाल्याची नागरीकांत चर्चा आहे. ज्या चोरीच्या घटना झाल्यात, त्या घटनास्थळांना भेट देण्याचं सौजन्यही पोलिसांनी दाखवले नसल्याचे संबधित नागरीक सांगतात. त्यामुळे पोलिसांची उदासीन कामगिरी नागरीकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

सांगवी आष्टीची चोरी दोन लाखाची असूनही पहिल्या दिवशी घटनास्थळी पोलीसांना जावे वाटले नाही. मात्र दुसरे दिवशी एका नेत्याने तोंड उघडल्यामुळे महाशयांनी नाविलाजास्तव घटनास्थळी भेट दिली. परंतू परतीच्या मार्गावर नको, तेथे भेट देऊन त्या मामांकडे यथेच्छ आस्वाद घेऊन रंगलेल्या पांचट गप्पात साहेबांनी सत्य लिहिणा-या पत्रकारांनाचा तोंडभरुन उध्दार केल्याचे त्यांच्याच एका वैतागलेल्या इमानदार कर्मचा-याने पत्रकारांना सांगीतले. रात्री गस्त घालणा-या नागरीकांची बैठक घेऊन काही सुचना करणे, त्यांचे मनोधैर्य वाढविणे हे साधं कामही खुर्चीत बसून कारभार हाकणा-या पोलिस अधिका-यांकडून अद्याप झाले नाही. असे गस्तकरी सांगतात.

ठराविक लोक सोडले तर त्यांचा कुठे संपर्क दिसत नाही. पोलिस निरिक्षकांच्या तापट स्वभावामुळे ठाण्यातील चार-पाच “खास” पोलिस कर्मचारी वगळता, बहुसंख्य कर्मचारी काम करुनही बोलणे-टोमणे खाऊन त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे कुणी जवळ जात नाही. तालुक्यातील ब-याच चोरी, घरफोड्यांचा तपास कायम कागदावरच आहे. तसेच ठाण्यात आलेल्या लोकांची फिर्याद लवकर नोंदवून न घेण्याच्या सवयीमुळे फिर्यादीही तक्रार देण्याच्या भाणगडीत पडत नसतात. त्यामुळे बहुचर्चित आष्टी पोलीस ठाणे सध्या पोलिस- पब्लिक सुसंवाद नसलेले एकमेव ठाणे म्हणून नागरीकांच्या चर्चेचा विषय बनले आहे.

वजनदार लोकप्रतिनिधी वगळले तर इतर साध्या तक्रारदाराला देखील पोलीसांकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे आता तत्कालिन कार्यकठोर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सारख्या खमख्या पोलिस अधिका-याची आष्टीकरांना पुन्हा एकदा गरज भासू लागली आहे. त्याशिवाय आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फोफावलेले बेकायदेशीर धंदे ,बेवड्यांची दादागिरी, मलाईदार वाळूचा धंदा आणि वाढत्या चो-यांना आळा बसणार नसल्याचे नागरीकांत उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here