Editorial : विधान परिषदेसाठी व्यूहनीती

1

राष्ट्र सह्याद्री | 12 मे 

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करण्याची शिवसेना व राष्ट्रवादीची तयारी नाही. त्यातच राज्य एकीकडे कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना निवडणुकीच्या व्यूहनीतीत गुंतून पडायला नको, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

विधानसभेतील पक्षीय बलाचा विचार करता शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येण्यासाठी बाहेरच्या दोन आमदारांच्या मतांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या पक्षांच्या आमदाराव्यतिरिक्त चार आमदारांची गरज आहे. या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिलेल्या आणि निवडून आणलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेतली, तर शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य विधान परिषदेवर निवडून जाण्यात कोणतीही अडचण नाही. त्यात ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे, माजी आमदार शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांच्या विजयासाठी मतांचा कोटा या दोन पक्षांनी अगोदर निश्चित केला आहे. असे असले, तरी कोणताही धोका नको तसेच कोरोना संकटाच्या काळात मतदानासाठी आमदारांना मुंबईत बोलावून त्यांच्या जीविताशी खेळण्याची वेळच येऊ नये, असे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे मत होते.

त्यामुळे राज्यातील आमदारांची पक्षनिहाय संख्या लक्षात घेता शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक जण विधान परिषदेवर सहज निवडून जाऊ शकतो. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार आणि आठ अपक्ष आमदारांनी त्यांना दिलेला पाठिंबा लक्षात घेतला, तर भाजपचे चार जण विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी त्यांना आणखी तीन  आमदारांची गरज आहे. तीच गोष्ट काँग्रेसचीही. काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी १२ आमदारांच्या मतांची गरज आहे. ठाकरे सरकारवर विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना मिळालेली मते आणि त्रयस्थ आमदारांची मते विचारात घेतली, तर काँग्रेस दुसरी जागा सहज जिंकू शकते, असा तिला विश्वास आहे.

असे असले, तरी निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून भाजप चार, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन आणि काँग्रेसने एक जागा लढवावी, असा सूर होता. महाविकास आघाडीतही सुरुवातीला त्यावर एकमत झाले होते; परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सुरुवातीपासून महाविकास आघाडी सहा जागा लढवेल, असे सांगत होते. काँग्रेसने सुरुवातीला एकच उमेदवार जाहीर केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत होती; परंतु आता दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने एकाऐवजी दोन उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातील आमदार निवडणुकीच्या निमित्ताने विनाकारण मुंबईत येऊ नयेत, त्यांच्या जिवाला धोका होऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील होती; मात्र काँग्रेसच्या या नव्या भूमिकेमुळे शिवसेना नेतृत्व नाराज असल्याचे समजते.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने चार उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष प्रत्येकी दोन जागा लढवणार आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन  जणांना उमेदवारी द्यावी, तर काँग्रेसने संख्याबळानुसार एकच उमेदवार उतरवा अशाप्रकारची रणनीती आधी ठरली होती. काँग्रेसने विधान परिषदेसाठी राजेश राठोड आणि पापा मोदी यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या चारही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीपेक्षा कमी मतांची गरज असल्याने त्यांनी चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

साहजिकच आता संख्याबळानुसार भाजप चार, शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येतो. मात्र आता काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, का याबाबत साशंकता आहे. असे असले, तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संजय राऊत यांनी मात्र विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, असे सांगितले आहे. ती कशी होईल, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेनेमध्ये मात्र नाराजी आहे.

वास्तविक ठाकरे यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा वा विधान परिपषद या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य बनणे आवश्यक असल्याने कोरोना काळात त्यावर तोडगा काढण्यासाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे; मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले आमदार मतदानाच्या निमित्ताने विनाकारण मुंबईत येऊ नयेत असे शिवसेनेला वाटते. निवडणूक घ्यायची झाल्यास पुन्हा कळत नकळत घोडेबाजाराला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे यासर्व गोष्टी टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेना प्रयत्नशील होती. त्यासाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बैठकाही घेण्यात आल्या होत्या; मात्र आता काँग्रेसने दुसऱ्या नावासाठी आग्रह धरल्याने शिवसेनेमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी संख्याबळानुसार आमचे दोन सदस्य विनासायास निवडून येतील, असे त्यांनी सांगतिले.

महाविकासआघाडीचे सगळे उमेदवार आज त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी भाजपचे चार, तर काँग्रेसचे दोन उमेदवार निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनही प्रत्येकी दोन  उमेदवार देणार आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने अर्ज  मागे घेतला नाही, तर विधानपरिषद निवडणूक अटळ आहे. १४ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर २१ मे रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक होईल. ठाकरे यांना आमदार करण्यासाठी विधान परिषदेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. नऊ जागांसाठी दहा उमेदवार असल्याने आता निवडणूक अटळ आहे, असे सध्या तरी चित्र आहे.

या निवडणुकीत विधानसभेतील २८८ आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला, तर तर एक उमेदवार निवडून येण्यासाठी २९ मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ असे एकूण १५४ चे संख्याबळ आहे. याशिवाय प्रहारचे  दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक, शेकापचा एक, बहुजन विकासआघाडीचे तीन, सपचे दोन, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा एक आणि अपक्ष सात  असे एकूण १५४+१७ म्हणजेच १७१ आमदारांचे पाठबळ आहे. महाविकासआघाडी सहा जागा लढवत असल्यामुळे २९ मतांच्या कोट्यानुसार त्यांचे सहा उमेदवार जिंकण्यासाठी १७४ मतांची गरज आहे. म्हणजेच सहावी जागा जिंकण्यासाठी महाविकासआघाडीला तीन मते कमी पडत आहेत.

ही तीन मते लहान पक्ष जे तटस्थ आहेत, त्यांची मत मिळून सहावी जागा जिंकता येईल, असा काँग्रेसचा दावा आहे. भाजपकडे स्वत:चे १०५ आमदार आणि आठ अपक्ष असे एकूण ११३ आमदार आहेत. २९ मतांच्या कोट्यानुसार भाजपला चार जागा निवडून आणण्यासाठी ११६ मतांची गरज आहे. महाविकासआघाडीप्रमाणेच भाजपलाही चौथी जागा जिंकण्यासाठी तीनच मते कमी पडत आहेत. विधानसभेमध्ये तीन पक्ष तटस्थ असून त्यांच्याकडे चार आमदार आहेत. यामध्ये एमआयएमचे दोन, मनसेचा १ आणि सीपीएमचा एक आमदार आहे. विधान परिषदेवर अधिकचा आमदार महाविकासआघाडीचा जाणार का भाजपचा हे या तटस्थ आमदारांवर अवलंबून आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here