Editorial : खडसेंचा शाप

0

राष्ट्र सह्याद्री 14 मे  

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजपात निर्माण झालेल्या वादाचे कवितत्व अजून थांबायला तयार नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे थांबत नाही आणि त्यात आता फडणवीस यांचे पूर्वाश्रमीचे निकटवर्तीयही सहभागी झाले आहेत. आपल्याला काही मिळाले नाही, तर व्यक्ती कशा दूर जातात आणि संघटनेवरही कशी टीका करतात, हे नवीन नाही. भाजपात सध्या सुरू असलेला कलगीतुरा पाहिला आणि थेट सांगलीपासून जळगावपर्यंत निर्माण झालेली खदखद पाहिली, भाजपची आता काँग्रेस झाली आहे.  

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम कदम यांनी भाजपला आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. सांगली जिल्ह्याला एक अतिरिक्त आमदार मिळणार असला तरी त्याचे स्वागत होण्याऐवजी भाजपअंतर्गत खदखदच बाहेर पडत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावरून ज्या पडळकरांनी आरेवाडीच्या बनामध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी बिरोबाची आण घेऊन मोदींना पराभूत करण्याचे आवाहन हार्दिक पटेल यांच्या साक्षीने केले, त्याच पडळकरांना देण्यात आलेली संधी निष्ठावंत गटाला पचनी पडण्यास अवघड जात आहे.

पडळकर यांचे वक्तृत्व तरुणाईला भुरळ पाडणारे आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून भाजपशी काडीमोड घेत पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय पाटील यांच्या विरोधात बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याची दांडगाई केली, असा आक्षेप निष्ठावंत गटाचा आहे. मात्र, ही लढाई केवळ दिखाऊपणा होता, हे त्यांना बारामती मतदारसंघातून भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भाजपने उतरविले, त्यावेळीच स्पष्ट झाले. कारण लोकसभेच्यावेळी सांगलीत एकास एक लढत झाली तर भाजपची अडचण होऊ शकते. हे ओळखून पडळकर यांना मैदानात उतरण्यास भाग पाडले गेले. त्याचवेळी वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचाही आरोप करण्यात आला होता. तिथे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली हा भाग वेगळा.

पडळकर यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य फार मोठे आहे असे म्हणता येणार नाही; मात्र धनगर समाजातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी लागणारी भाषणबाजी निश्चित आहे. त्यांच्या आमदारकीने समाजाचा प्रश्न मिटले असे म्हणण्याचे धाडस या घडीला तर करता येणार नाही आणि त्यांच्या आमदारकीमुळे भाजपला फार मोठा लाभ होणार असेही नाही. त्यांना संधी देण्यामागे नेमके काय हेतू आहेत हे आज अनाकलनीय असले तरी पक्षामध्ये कोणाला मोठे होऊ द्यायचे नसावे, असे मानले जात आहे.

अगोदरच राज्यातील भाजपची सत्ता गेली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आजही अस्वस्थ आहेत. त्यात ज्यांनी भाजपला शिव्या-शाप दिले, त्यांच्याच स्वागताची तयारी करण्याची वेळ निष्ठावंतावर आल्याने अंगाचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. आयारामांच्या ताकदीवर मोठे झालेल्या भाजपचे वेगाने काँग्रेसीकरण होत असल्याचेच हे द्योतक आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेल्या माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांना भाजपने इतर मागासवर्गीय चेहरा म्हणून पुढे केले. सुरुवातीला त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडील बहुतांश खाती होती. त्यानंतर त्यांना जलसंधारण हे महत्वाचे खाते दिले. माजी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणविले जाणा-या प्रा. शिंदे यांना त्यांच्यापेक्षाही पंकजा मुंडे महत्त्वाच्या आहेत. त्याचे कारण त्यांच्या मतदारसंघात असलेली वंजारी समाजाची संख्या. मुंडे त्यांचाही पराभव झाल्याने ते सैरभैर झाले आहेत.

डाॅ. सुजय विखे व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावर ते नाराज आहेत. त्यांच्यामुळेच आपला पराभव झाल्याचे ते मानतात. अहिल्याबाई होळकर यांच्या गावातील आणि त्यांचेच वंशज समजल्या जाणा-या प्रा. शिंदे यांना पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेले फारसे आवडलेले नाही. आपले राजकीय पुनर्वसन करण्याऐवजी धनगर समाजातीलच पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. पडळकर यांच्या पक्षातील वाढत्या प्रभावामुळे शिंदे यांची राजकीय कुचंबणा झाली आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींतून नाराज झाल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनगर समाजातील चेहरा म्हणून शिंदे यांना संधी दिली. नितीन गडकरी यांनीही मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे यांना प्रचारासाठी नेले होते; मात्र आता त्यांना पडळकर यांच्यामुळे प्रतिस्पर्धी तयार झाल्याचे मानले जात आहे.

भाजपने विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. त्यावर नव्याने सामाजिक समीकरणाची मांडणी करण्याचे काम केले आहे, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले; परंतु या स्पष्टीकरणाचा समाचार घेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

भाजप सामाजिक समीकरणाच्या मांडणीविषयी बोलताना खडसे म्हणाले, “नव्याने मांडणी करत असताना प्रामाणिकपणे मांडणी करावी. हा पक्ष ज्यावेळी पाहत होतो. त्यावेळी आणीबाणीचा कालखंड होता. जनता पक्षाचा कालखंड होता. त्यानंतर स्वतः मी कार्यरत होतो. तेव्हा या पक्षाची ओळख जी होती, ती मारवाडी, ब्राह्मण अशा पक्षाची ओळख होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, मी असेल, भाऊसाहेब फुंडकर असतील, या सर्वांनी मिळून या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. तोपर्यंत बहुजनांचा चेहरा नव्हता. इथे कुणी यायला तयार नव्हते. ओबीसींच्या संघटना तयार झाल्या. ओबीसींचे नेते तयार झाले. वर्षानुवर्षे ज्यांनी पक्षाला बळ दिले. चेहरा बदलवला. तो चेहरा बदलवणे आता आम्हाला सांगता आहात का?,” असा सवाल खडसे यांनी केला.

फडणवीस यांच्याविषयीचा राग खडसे यांच्या मनातून वारंवार व्यक्त होतो. फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस आपण केली होती, त्याचीच फळे आता भोगतो आहोत, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. तावडे, मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केलीच आहे. विधान परिषदेसाठी नावांची शिफारस केल्याची माहिती आम्हाला मार्चमध्ये देऊन प्रत्यक्षात ऐनवेळी वेगळेच उमेदवार देण्यात आले. आम्हाला मुर्खात काढण्यात आले, असा संताप त्यांनी व्यक्त केला. आमच्या ताकदीने, मेहनतीने पक्ष वाढला. यांचे काय योगदान आहे पक्षामध्ये? कितीवेळा हे तुरूंगात गेले? कितीवेळा दगड खाल्ले? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचे वाईट वाटते, अशी खंत त्यांनी खडसे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर विरोधी पक्षात एकटे असताना भाजपचे १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळे असूनही १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले, ही त्यांची टीका कुणाविरुद्धव आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. पुढे कष्टानं जावे लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही,” असा घणाघाती हल्ला खडसे यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर केला.

खडसे यांचा हा शाप आहे. भाजपतील काही व्यक्ती मला जाणीवपूर्वक बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून अशा स्वरूपाचा छळ सुरू आहे, असे सांगताना त्यांनी वापरलेली भाषा असंसदीय असली, तरी दोनदा डावलल्याचा संताप त्यांच्या शब्दांशब्दांतून व्यक्त होतो आहे. मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी हे सहन करत आलो आहे; पण यालाही काही मर्यादा आहेत,” अशा शब्दांत खडसे यांनी आपला रोष व्यक्त करताना पुन्हा एकदा वेगळया पर्यायाचा स्वीकार करण्याचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here