Karjat : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला; पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांची कामगिरी

 प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री दि १४

कर्जत : वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक कर्जत पोलिसांनी शहरातील नागेश्वर मंदिर स्मशानभूमीजवळ पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी पकडला. या कारवाईत अवैध वाळूसह ट्रक जप्त करण्यात आला असून ट्रकचा चालक तसेच मालक यांना कर्जत पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली. 
कर्जत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, चालक गौतम फुंदे आणि पोलीस नाईक इरफान शेख हे कोरोना पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग गस्त करीत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक सातव यांना गुप्त माहिती मिळालेली की, कापरेवाडी रस्त्याने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक येत आहे. सदर माहितीची शहानिशा करीत उपअधीक्षक सातव यांनी तात्काळ कर्जत पोलिसांना त्यावर कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार पोलीस नाईक बजरंग कोळेकर, संतोष साबळे यांनी पोलीस कॉन्स्टेबल आदित्य बेल्हेकर व इतर दोन पंचासह कर्जतच्या स्मशानभूमीजवळ पाळत ठेवली. पावणेआठ वाजेच्या सुमारास सदर पथकाला अवैधरित्या तीन ब्रास वाळू वाहतूक करताना लाल ट्रक (एम. एच.१२, ई.क्यू .६४७०) आढळून आला.
विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी ट्रकचा चालक मोहन दगडू गोरे, (वय : ४१) तसेच ट्रकचा मालक भाऊसाहेब पिराजी गोरे (वय : ३५) दोघे रा. भांडेवाडी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीनुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांचा आदेशाचा भंग करणे तसेच भादवी कलम ३७९, १८८, २६९, २७० पर्यावरण संरक्षण अधिनियम ३,१५ व साथ रोगप्रतिबंधक कायदा कलम २, ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here