Shevgaon : लॉकडाऊनच्या काळात सुशिक्षित युवकांना बेरोजगार भत्ता मिळावा – सभापती डॉ. क्षितिज घुले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव – संपूर्ण जगामध्ये कोरोना कोविड (19) च्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यवसाय, व्यापार, बाजारपेठ बंद असल्याने कामगार वर्गाच्या हाताला काम राहिले नाही, काम नाही तर त्यांना वेतनही नाही अशा दुहेरी संकटामुळे युवक वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाकडून बेरोजगार भत्ता मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी निवेदनाद्वारे केली.

सध्याच्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाशी लढा देत असताना अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. यामध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या सर्वच घटकांचे डॉ.क्षितिज घुले यांनी आभार मानले. आपल्या राज्यात ग्रामीण भागातील युवक वर्ग नोकरी-व्यवसाय निमित्ताने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेला आहे. यामध्ये शेतकरी, ऊस तोडणी कामगार, शेतमजूर, कुटुंबातील युवकांचा मोठा सहभाग आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातून ग्रामीण भागात या युवकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. काही युवकांनी तर बँकांकडून कर्ज घेऊन शहरांमध्ये छोटे मोठे उद्योग चालू केले. परंतु सध्या शहरे बंद असल्याने कर्ज फेडणे कठीण होऊन बसले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

युवकांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये आजच्या घडीला आर्थिक चणचण भासू लागल्याने युवक वर्ग हवालदिल झाला आहे. अनेक युवकांवर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते. येत्या पुढच्या काळात युवकांना उभारी घेण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. इतर प्रगत देशांप्रमाणे आपल्या राज्यातील युवकांना बेरोजगार भत्ता मिळावा, अशी मागणी डॉ.क्षितीज घुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांचे मोठे हाल होत असून, ग्रामीण भागातील छोटे-मोठे घरगुती उद्योग, बारा बलुतेदारांचे व्यवसाय देखील अडचणीत सापडले असून, ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू असलेला बळीराजा देखील अडचणीत सापडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचे अर्थकारणच कोलमडले असून भविष्यात या समस्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी भविष्यात शासनस्तरावरून ग्रामीण भागात भांडवली गुंतवणूक वाढवून ग्रामीण भागाला आर्थिक पाठबळ द्यावे की जेणे करून युवकांना उभारी येईल, अशी मागणी डॉ. घुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here