Shrirampur : अवैध वाळू उपस्यामुळे खानापूर बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात!

अव्वलगाव शिवारातील अवैध वाळू वाहतुकीचा बंदोबस्त करण्याची खानापूर ग्रामस्थांची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

माळवाडगांव – खानापूर येथील गोदावरी नदीपात्रातून अव्वलगाव शिवारात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून हा वाळू उपसा बंधाऱ्या लगत सुरू असल्यामुळे दहा ते बारा गावची जीवनदायिनी असणाऱ्या खानापूर बंधाऱ्याचे अस्तित्व अव्वलगाव शिवारातील वाळू माफियांकडून अवैध वाळू उत्खनन सुरु असल्याने धोक्यात आले आहे. 

सध्या सर्वदूर कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, लाॅकडाऊनचा गैरफायदा घेत खानापूर व अव्वलगाव येथील नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळू उपसा होत आहे. या अवैध वाळू उपसा विरुद्ध खानापूरचे ग्रामस्थ एकवटले असून आज (दि.१६) येथील ग्रामस्थांनी नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदून बंद केला आहे.

सध्या तहसील प्रशासन कोरोनाच्या कर्तव्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणाऱ्यांची चांगलेच फावले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर आणि वैजापूर तालुक्यातील अव्वलगाव शेजारील गावामध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे नागरिकांमधून सांगितले जात आहे. तसेच कोरोनामुळे खूपच अडचणी असल्याने घरांचे बांधकाम करणार्‍या सामान्य नागरिकांना अवाजवी भावाने अवैध वाळू पुरवठा केला जातो. या वाळूतस्करांचे गावोगावी एजंट असून यांच्या मध्यस्थीने ऑर्डर घेऊन रात्रीच्या वेळी खूपच सावधानी बाळगून महसूल प्रशासनाची चाहूल घेत वाळू पुरवठा केला जात आहे.

प्रशासन एकीकडे कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतले असताना या संधीचा फायदा वाळूमाफिया चांगलाच उचलताना दिसत आहेत. खानापूर येथील नदीपात्रातून श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यात भरमसाठ प्रमाणात वाळू वाहतूक केली जात असून याकडे संबंधितांचे हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे देखील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

गोदावरी नदीतील वाळूचा अधिकृत ठेका नसल्याने तसेच ठेके प्रचंड महाग झाल्याने तेथे पैसे वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशातून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मॅनेज करता येते. हा साधासोपा फॉर्म्यूला वाळू माफियांनी सुरू केला आहे. वाळू माफियांच्या दलालांनी महसूलची संपूर्ण यंत्रणा मॅनेज केली आहे. यामध्ये नदीपात्राचे तर प्रचंड नुकसान होतच आहे. परंतु शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. या सर्व प्रकरणाकडे अहमदनगर व औरंगाबाद या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही वाळूचोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यातील अनेक भागात सर्रासपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्याबाबत तक्रारी करुनही महसूल प्रशासन कानाडोळा करत आहे. एकीकडे दुष्काळाची झळ तर दुसरीकडे बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्र मोठे होऊन पाणी वाहून जाते वाळू उपशामुळे नदीपात्र जवळील हजारो एकर शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. विषेश म्हणजे अधिकृत गट सोडून इतर नदीपात्रात होणाऱ्या वाळू उपशावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत वाळू माफियांना वेळीच वेसण घातली नाही तर, ग्रामस्थांचा आणखीनच वाढेल, असा इशारा खानापूरच्या ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे. यावेळी महसूलचे तलाठी अविनाश तेलतुंबडे, पोलीस पाटील संजय आदिक यांच्यासह खानापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैजापूर तालुक्यातील अव्वलगाव शिवारातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, याकडे वैजापूर प्रशासनाचे पूर्णपणे दूर्लक्ष आहे. त्यामुळे या वाळू माफियांना वैजापूर प्रशासन पाठीशी तर घालत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here