Shrigonda : जादादराने खते व बियाणे विक्री केल्यास परवाना रद्द; बांधावर खत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर, कृषि सेवा केंद्रावरील गर्दी हटविण्यासाठी शासनाने बांधावर खत वाटप योजना सुरू केली आहे. “शेतक-यांनी गटाद्वारे मागणी करून, या योजनेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी केले आहे. 

बियाणे तसेच खताची जादा भावाने विक्री केल्यास, संबंधित कृषि सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, असा ईशारा त्यांनी दिला आहे. पावसाचे दिवस जवळ आले असून, शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे, रासायनिक खतांची जुळवा जुळव करीत आहे. कृषि सेवा केंद्रावर होणारी गर्दीमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने, शासनाने बांधावर खत व बियाणे वाटप योजना सुरू केली आहे.

यासाठी शेतक-याने गट तयार करावा, त्यांनी गटप्रमुखाकडे पैसे जमा करावे व त्या गटप्रमुखाने कृषि सेवा केंद्र चालकाकडे पैसे जमा करावे. त्यानंतर कृषी सेवा केंद्र चालक गटाला थेट गावात खत पोहोच करेल. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका टळेल व शासनाने निर्धारित केलेल्या दरातच खत उपलब्ध होईल.
शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकरीबंधुंनी घ्यावा असे, आवाहन म्हस्के यांनी केले आहे. तालुक्यातील कृषि सेवा केंद्रावर सर्व प्रकारच्या खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. तरीहि कृषि सेवा केंद्रावर खरेदी करता शेतकरी गर्दी करीत आहेत. याचा फायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करुन बियाणे व खते यांची चढ्या भावाने विक्री केल्यास, अशा कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करुन, कृषि सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, असा ईशारा पद्मनाभ म्हस्के यांनी दिला.
चढ्या भावाने खतांची विक्री करणाऱ्या दुकानाची कृषि कार्यालयात तक्रार करावी, तक्रार करणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून कृषी सहाय्यकामार्फत माहिती दिली जात आहे. शिवाय वर्दळीच्या ठिकाणी माहिती सूचना लावण्यात येत आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here