Ahmednagar Breaking : Newasa : धोकादायक दुभाजकावर आदळून बस उलटली

महिला व पुरुष प्रवासी जखमी : पोलिसांतल्या माणुसकीने कामगार गहिवरले

नेवासा | प्रतिनिधी

नेवासा – परप्रांतीय कामगारांना त्यांच्या प्रदेशात सोडविण्यासाठी निघालेली बस नेवासा फाट्यावरील रस्ता दुभाजकाला आदळून उलटल्याने एका महिलेसह दोन पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी हानी होता होता टळली
पुण्यातील पिंपरी येथून उत्तरप्रदेशातील इलहाबादला कामगारांना सोडण्यासाठी निघालेली खाजगी बस क्र. एम.एच. 12 – 4268 नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे दुभाजकावर आदळून पलटी झाली. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने बस मधील प्रवाशांनी घाबरून एकच कल्लोळ केला. या गदारोळाने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती समजताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी तत्पर धाव घेऊन दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना धीर देत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेले. परप्रांतीय प्रवाशांची कुचंबणा लक्षात घेऊन डेरे यांनी या दुर्घटनाग्रस्त प्रवाशांच्या चहा, पाणी, नाश्त्याची व्यवस्था करून दुसऱ्या पर्यायी वाहनांची सोय करून दिली. सर्व व्यवस्थित पार पडेपर्यंत डेरे स्वतः जातीने उपस्थित राहून अपघातग्रस्तांच्या समस्या आपुलकीने समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी धावपळ करत असल्याचे पाहून या परप्रांतीय प्रवाशांना अक्षरशः गहिवरून आल्याचे दिसून आले.
किती बळी घेणार? –
नेवासा फाट्यावरील या धोकादायक रस्ता दुभाजकामुळे आजवर असंख्य गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे तर गंभीर जखमी होऊन अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. अर्धवट स्वरूपात केलेल्या या रस्ता दुभाजकामुळे या भागात अपघातांचे सत्र कायम असून अतिक्रमण धारकांचे हित जपण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. हे काम पूर्ण करून अपघातांची मालिका न थांबल्यास या रस्ता कामाच्या ठेकेदार कंपनीचा खडका फाट्यावरील टोल नाका उखडून टाकण्याचा निर्वाणीचा इशारा जिल्हा काँग्रेस (एस.सी. विभाग) जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी दिला आहे.
धोकादायक रस्ता दुभाजक

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here