म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी ‘ही’ योग्य वेळ!

नमस्कार…
दैनिक राष्ट्र सह्याद्रीमध्ये ‘पैशांविषयी बोलू काही’ या सदरात मी वाचकांच्या आर्थिक प्रश्नांना दर सोमवारी उत्तरे देणार आहे. देशाचे अर्थकारण आणि त्याचे सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या जीवनावर होणारे परिणाम – असे या प्रश्नोत्तरांचे स्वरूप असेल. अर्थात, प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते आणि आर्थिक घडामोडी आणि अर्थकारणाविषयीची समजही वेगवेगळी असते. त्यामुळे एकच उत्तर सर्वाना लागू होऊ शकत नाही, याचे भान सर्वानी ठेवावे.
दुसरे म्हणजे अगदी वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न असतील तर येथे मिळणार्‍या मर्यादित शब्दसंख्येत त्या प्रश्नाला न्याय देता येईलच, असे नाही. त्यामुळे त्यासंबंधीचे इतर कंगोरे इतर जाणकारांकडून आपण समजून घेतले पाहिजेत किंवा दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या माध्यमातून आपण माझ्याशी संपर्क साधू शकता.
गुंतवणूक विषयक प्रश्न येणार आहेत. तेव्हा त्याच्या उत्तरात काही जोखीम असलेले मार्ग ज्यावेळी सुचविले जातील, तेव्हा त्या गुंतवणुकीतील जोखीमीकडे दुर्लक्ष करून आणि त्याची जबाबदारी स्वत: घेऊन ती करणे अपेक्षित असते, हे विसरता कामा नये. कारण जगातील कोणतीही गुंतवणूक जोखीमीशिवाय उपलब्ध नाही आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून या मार्गांनी पैसा मिळविला आहे, त्यांनी त्या मार्गातील जोखीम स्वीकारली, म्हणूनच ते पैसे मिळवू शकले, याचे भान ठेवले पाहिजे.

-आपला,
यमाजी मालकर

प्रश्न – कोरोनामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? अर्थव्यवस्था सुधारण्यास किती काळ लागेल?


उत्तर – कोरोनाचे संकट अजून किती लांबणार आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. अर्थव्यवस्थेचे तब्बल दोन महिने अतिशय मर्यादित व्यवहार होत गेले आहेत. या दोन महिन्यात अनेकांची पैशांची पुंजी संपत आली आहे. आता आजपासून सुरु होणार्‍या चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही व्यवहार सुरु होणार असले तरी त्याची साखळी पूर्ण होणार नसल्याने त्याला मर्यादाच रहाणार आहेत. याचा अर्थ पूर्वीच्या वेगाने अर्थव्यवस्था पळणार नाही, एवढे नक्की झाले आहे. जेवढे नागरिक काम करत होते, तेवढ्या नागरिकांच्या हाताला लगेच काम मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या संकटात बेरोजगारी वाढणार, हा सर्वात गंभीर परिणाम असेल. त्यामुळे आपला रोजगार वाचविण्यासाठी सर्वानाच प्रयत्न करावा लागेल. खरे म्हणजे अधिक वेतन घेणार्‍यांचे वेतन विशिष्ट प्रमाणात कमी करणे आणि कमी वेतन असणार्‍यांचा रोजगार टिकविणे, हा या संकटावर मात करण्याचा खरा मार्ग आहे. पण त्याविषयीचा समंजसपणा दाखविला जातोच, असे नाही. आपण कामगारांना अधिक वेतन देतो असे मालकाला वाटणे आणि आपल्याला आपल्या कामाच्या मोबदल्यात फारच कमी वेतन मिळते, असेच सर्वांना वाटते. असे वाटणे, हे सर्वसाधारण परिस्थितीत समजू शकते. पण या अभूतपूर्व संकटात वेगळा विचार करता आला पाहिजे. तसे झाले तर आम्ही एक देश म्हणून अनेक रोजगार वाचवून अर्थव्यवस्थेतील मागणी काही प्रमाणात कायम ठेवू शकू. वस्तू आणि सेवांना मागणी राहिली तरच अर्थव्यवस्था चालू शकते. अशा या पेचात, हानी ही अटळ असली तरी शक्य तेवढ्या अधिक जणांना वाचविणे, ही दिशा असली पाहिजे. तसा विचार सरकार आणि समाजाने केला तर या संकटातून आपण लवकर बाहेर पडू. सुदैवाने सरकार सर्व क्षेत्रासाठी काही ना काही तरतूद करण्याचा प्रयत्न करते आहे.
अर्थव्यवस्था सुधारण्यास किती काळ लागेल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. प्रत्येक क्षेत्रावर त्याचा वेगवेगळा परिणाम झाला आहे. उदा. हॉटेल, पर्यटन, छोटे व्यवसाय, सांस्कृतिक, शेती, वाहतूक क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. तर औषधे, जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे, केमिकल कंपन्यांना फायदा झाला आहे. या काळात जर कोरोनावरील लस किंवा त्याचा अटकाव करणारे एखादे औषध शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आल्यास भारताची अर्थव्यवस्था लवकर सुधारेल. त्याचे कारण म्हणजे भारताची कृषीआधारित अर्थव्यवस्था आणि भारताची लोकसंख्या. जर कोरोनाची साथ अजून एक दोन महिने लांबली तर मात्र पुढील दोन वर्षे अर्थव्यस्स्थेचा विचार न करता नागरिकांना जगविणे, एवढा एककलमी कार्यक्रम सरकारला हाती घ्यावा लागेल.

एक महत्वाची गोष्ट, हे सर्व अंदाज आहेत आणि कोरोनाने आतापर्यंत सर्वांच्या अंदाजांना खोटे ठरविले आहे. त्यामुळे पुढील अंदाज घेणे, हे मानवी स्वभावाला धरूनच असले तरी जग ज्या अभूतपूर्व संकटाचा सामना करते आहे, त्याचा मुकाबला एक नागरिक म्हणून मनावर प्रचंड ताबा ठेवून करणे, हेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.  

प्रश्न – म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला ही वेळ योग्य आहे की आणखी थांबावे? – डॉ. निशिकांत चव्हाण, श्रीरामपूरउत्तर – शेअर बाजार कधी वर जाईल आणि किती वर जाईल, तसेच तो कधी कोसळेल आणि किती कोसळेल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्याविषयीचे तज्ञांचेही अंदाज खरे ठरत नाहीत. म्हणूनच भारतातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ सुद्धा सध्या खाली आला आहे. त्यांनाही तोटा झाला आहे. आता शेअर बाजारावर अवलंबून असलेल्या म्युच्युअल फंडाचेही काही प्रमाणात तसेच आहे. अर्थात, जी जोखीम थेट शेअर खरेदी विक्री करण्यात आहे, ती जोखीम म्युच्युअल फंडात नाही. ती जोखीम तुलनेने कमी होते, एवढे मात्र नक्की. उदा. कोरोनामुळे शेअर बाजार कोसळल्याने थेट शेअर खरेदी करणार्‍यांना याकाळात 40 टक्के कागदोपत्री तोटा दिसतो आहे. तर म्युच्युअल फंडातील तोटा मात्र 20 टक्के म्हणजे निम्मा आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे का, असा प्रश्न आपण विचारला आहे. त्याचे उत्तर असे आहे की आपण एसआयपी म्हणजे दर महिन्याला विशिष्ट तारखेला विशिष्ट रक्कम गुंतविणार असाल तर त्याची सुरवात आपण लगेच केली पाहिजे. त्याचे कारण कोरोनाचे संकट आवाक्यात आले तर शेअर बाजार वर जाऊन त्याचा लाभ आपल्याला मिळेल. पण कोरोनामुळे होणारी हानी वाढली तर आपल्याला काही प्रमाणात त्यात सुरवातीच्या काळात कागदोपत्री तोटाही सहन करावा लागेल. आपली गुंतवणूक जर पुढील तीन ते पाच वर्षासाठी असेल तर डोळे झाकून एसआयपी सुरु करा आणि आपले उद्दिष्ट्य साध्य झाले की कोणताही विचार न करता त्यातून बाहेर पडा. शेअर बाजार असो की म्युच्युअल फंड, यात एकाच वेळी पैसे गुंतविण्याचा हा काळ नव्हे. पण आपल्याला जर चांगले आर्थिक सल्लागार असतील तर त्यांना विचारून जीवनावश्यक वस्तूंच्या कंपन्यांत (एफएमसीजी) गुंतवणूक करणार्‍या म्युच्युअल फंडात आपण गुंतवणूक करू शकता. हे क्षेत्र कायमच सुरक्षित मानले जाते, कारण भारतासारख्या 136 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात या वस्तूंचा खप होतच राहणार. दुसरे सुरक्षित क्षेत्र म्हणजे फार्मा किंवा औषधे. या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड आहेत. त्यांच्यातही आता गुंतवणूक करू शकता. शेअर बाजार असो की म्युच्युअल फंड – यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असते, हे लक्षात घ्या. हा पैसा जर आपल्याला पुढील सहा महिने – वर्षभरातच लागणार असेल तर या मार्गाने न गेलेले बरे.
अधिक पैसा असल्यास आणि प्रासंगिक कारणाने शेअर बाजार 5 टक्के खाली आल्यास चांगल्या म्युच्युअल फंडात एकदम पैसा गुंतवण्याचा सल्ला काही सल्लागार देतात. पण गुंतवणूक नावाच्या कुस्तीतील तो कसलेल्या पहिलवानानेच खेळण्याचा डाव आहे. नव्या पहिलवानाने त्या डावाच्या वाटेला जाऊ नये. त्याविषयी पुढे कधीतरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here