कोरोनामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अडचणीत

0

लातूर : मराठी साहित्याचा सोहळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे अडचणीत आले आहे. कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला, जनजीवन पूर्वपदावर आले तरच संमेलन घेण्याबाबत हालचाली करू, अन्यथा आगामी संमेलन घ्यायचे नाही, असा महत्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. दरम्यान, ऑनलाईन साहित्य संमेलनाचा पर्याय काहींनी समोर आणला आहे. पण, त्याला महामंडळाने नकार दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक समारंभ, सोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून पुढील सहा महिन्यांनी होणाऱ्या सोहळ्यांबाबतही आताच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. अशा प्रकारचा निर्णय साहित्य महामंडळाने आपल्या आगामी साहित्य संमेलनाबाबत घेतला आहे. त्यामुळेच आगामी संमेलनाचे स्थळ ठरविण्यासाठी समिती नेमण्यात आली नाही. दरवर्षी ते मे-जूनमध्ये जाहीर केले जाते.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साहित्य महामंडळाची नियोजित बैठक होऊ शकली नाही. या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाचे स्थळ निवडण्यासाठी समिती नेमली जाणार होती. ती आम्ही नेमु शकलो नाही. दिल्ली, नाशिक, अंमळनेर येथून आगामी संमेलनासाठी निमंत्रण आले होते. या स्थळांची पाहणी करू शकलो नाही. इच्छा असूनही संमेलनाची पूर्वतयारी सध्या करता येत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. कोरोनाची लस तयार होणे आणि ती सर्वांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच आपल्याला संमेलनाबाबतच्या हालचाली करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here