Editorial : पॅकेजवर गुंतवणूकदार नाराज

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वीस लाख रुपयांचे पॅकेज पाच दिवसांत जाहीर झाले; परंतु या पॅकेजने गुंतवणूकदारांचे कोणतेही समाधान झाले नाही. सूक्षम, लघु व मध्यम उद्योगाला दिलेले अर्थसाह्यही भांडवली बाजारावर फार प्रभाव पाडू शकले नाही. त्याचे कारण गुरूवारी जेव्हा ही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली, त्यानंतरच्या सत्रात भांडवली बाजाराने निराशाच व्यक्त केली. त्यानंतर शनिवार आणि रविवारी विदेशी गुंतवणूकदारांना पायघड्या घालण्याचा निर्णय जाहीर केला.

संरक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण ७४ टक्क्यांवर नेले. त्याचे पडसादही बाजारात फार उमटले नाहीत. उलट, सोमवारी विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली. कोळसा, खाण, अवकाश, अणुऊर्जा आदी क्षेत्रातही खासगी कंपन्यांना गुंतवणूक करण्याची परवानगी दिली; परंतु त्याचाही बाजारावर काहीच परिणाम झाला नाही. उलट, दोन सत्रांत गुंतवणूकदारांचे सुमारे पावणेसहा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोरोना आणि टाळेबंदीचा सामना करणाऱ्या काही क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सलग पाच दिवस अर्थसाह्य जाहीर करूनही भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

आठवडयाच्या पहिल्याच सत्रात त्याचे विपरित पडसाद उमटताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रअखेर, शुक्रवारच्या तुलनेत थेट हजाराहून अधिक अंशांनी आपटला. परिणामी त्याने त्याचा ३१ हजाराचा स्तरही सोडला. निफ्टीनेही जवळपास ३.४५ टक्के निर्देशांक आपटी एकाच व्यवहारात नोंदवित त्रिशतकी घसरणीसह आठ हजार ८०० पर्यंतचा तळ गाठला. सप्ताहारंभीच्या पहिल्याच सत्रात बसलेल्या ३.४४ टक्के निर्देशांक घसरणफटक्यामुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीला एकाच व्यवहारात तब्बल तीन लाथ ६५ हजार कोटी रुपयांची ओहोटी लागली. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ११९ लाख कोटी रुपयांवर आले.

देशव्यापी टाळेबंदी महिनाअखेपर्यंत विस्तारल्याने व्यवसाय चिंतेतून भांडवली बाजारात सूचिबद्ध आदरातिथ्य तसेच मनोरंजन क्षेत्रातील समभागांचे मूल्य सोमवारी मोठ्या फरकाने घसरले. टाळेबंदी अजून कायम राहणार असून हाॅटेल व्यवसाय ही मर्यादित प्रमाणात सुरू होणार असल्याने या क्षेत्राशी निगडीत आयनॉक्स, पीव्हीआर तसेच शेलेट हॉटेल्स, इंडियन हॉटेल कंपनीसारख्या कंपन्यांचे समभाग मूल्य तब्बल १५ टक्क्यापर्यंत घसरले. संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली. व्यवसाय आणखी ठप्प राहण्याच्या धास्तीने नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सात टक्क्यांपर्यंत घसरले. यामध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, स्पाईसजेट यांचा क्रम होता.

कर्ज थकबाकीदार लघु उद्योगांच्या दिवाळखोरी व नादारी प्रक्रियेला स्थगिती दिल्याने बँकांच्या अनुत्पादित कर्जात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बँकांचे कर्ज थकविलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांवर दिवाळखोरी व नादारी संहितेअंतर्गत कारवाई करण्यास बँकांना एक वर्षांपुरती स्थगिती दिली आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिवाळखोरी सुरू करण्यासाठी किमान उंबरठा आधीच सहा महिन्यांपर्यंत वाढविला होता. सीतारामन यांनी या दिवाळखोर प्रक्रियेच्या स्थगिती कालावधीत आणखी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने बँकांच्या अनुत्पादित कर्जाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता बँकांकडून व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम या क्षेत्रातील समभागांचे मूल्य १० टक्क्यांर्यंत आपटले.

खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाही त्याला अपवाद राहिला नाही. इतका प्रतिकूल काळ असताना रिलायन्स जिओमध्ये आणखी एका परदेशी कंपनीने गुंतवणूक करण्याची घोषणा केल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू होतानाच दोन टक्क्यांपर्यंत तेजी नोंदवली. सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या पत्रकार परिषदेत विविध घटकांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजमध्ये उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी काहीच नसल्याची निराशा भांडवली बाजारातून व्यक्त झाली. बाजाराने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एक हजार अंकांनी गटांगळी खाल्ली. आत्मनिर्भर पॅकेजमध्ये आपल्या वाट्याला काही नाही.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढायला लागले आहेत. दुसरीकडे अमेरिका आणि चीन कोरोना विषाणूवरून परस्परांवर तुटून पडले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तणावाचा परिणामही भांडवली बाजारावर होत आहे. कोरोनामुळे लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीतून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे प्रयत्न करीत असताना गुंतवणूकदारांना अजून खात्री वाटत नसल्याने जोखीम पत्करायला कुणीही तयार नाही. औषध उत्पादक कंपन्या आणि रिलायन्स वगळता बहुतांश कंपन्यांचे शेअर घसरत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती पाच आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर गेल्या आहेत. कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जपानने पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले असल्याचे कबूल केले आहे. त्याशिवाय भारताचा चालू वर्षाचा विकासदर उणे राहील, असे अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. भांडवली बाजारात घसरण होत असताना मध्यंतरी म्युच्युअल फंडासाठी रिझर्व्ह बँकेने मदतीचा हात दिला, त्याचा चांगला परिणाम दिसायला लागला आहे. एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दोन लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. मंदी आणि अस्थिरता असूनही एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये ४६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मार्च २०२०मध्ये सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडांमधून दोन लाख १३ हजार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. मंदी आणि आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ४४ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या माध्यमातून एप्रिल २०२०अखेर एकूण मत्ता २४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. मार्च २०२०अखेर ही मत्ता एकूण २२.२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती.

एकीकडे भांडवली बाजारात फारसा परतावा मिळत नाही. दुसरीकडे बचत खात्याचे व्याज दिवसेंदिवस कमी होत आहेत. मुदतठेवींना फारसे व्याज मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर २०११ नंतर गेल्या वर्षी सोन्याने सर्वाधिक परतावा दिला. सोन्यांत भारतीयांची भावनिक गुंतवणूक असते. अडीअडचणीच्या काळात ते कामाला येते. त्यामुळे इक्विटीवर आधारित गुंतवणुकीला आणि अन्य गुंतवणूक साधनांना फटका बसत असतानाच एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफवर सर्वाधिक विश्वास टाकला आहे.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असणाऱ्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात अॅम्फीच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० मध्ये या फंडांमध्ये अनुक्रमे २०२ कोटी रुपये आणि एक हजार ४८३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तत्पूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१९मध्ये गोल्ड ईटीएफ फंडांमध्ये अनुक्रमे सात कोटी ६८ लाख रुपये आणि २७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातही गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक होत आहे, याचा अर्थ असा की गुंतवणूकदार अजूनही सोन्याची खरेदी करीत आहेत.

इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणावर मंदी दिसून आल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित साधनात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. सध्याच्या अस्थिरतेच्या बाजारात सोन्याशिवाय सुरक्षित गुंतवणूक दुसरी कोणतीही नाही. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्था आणि जगभरातील शेअर बाजारांची दैना उडाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातच सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे गुंतवणूकदार त्यामध्ये प्रॉफिट बुकिंगची संधीही शोधत आहेत. त्यामुळेच ऑक्टोबर २०१९मध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून ३१ कोटी रुपयांची गुंतवणूक मागे घेतली आणि मार्च २०२०मध्ये १९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. हल्ली बऱ्याच सजग गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणूक आवश्यक वाटते.

सोन्याच्या पोर्टफोलिओतील समावेशामुळे त्याला स्थिरता लाभते आणि सध्याच्या अस्थिर वातावरणात सोने चांगला परतावा मिळवून देईल, असा विश्वास वाटतो. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षांत मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणाऱ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी नऊ हजार १९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च २०२०च्या अखेरीस या फंडांमध्ये एकूण सात हजार ९४९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here