Rahuri : ‘कचरा मुक्त शहर’ स्पर्धेत देवळाली प्रवरा शहरास 3 स्टार मानांकन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – स्वच्छ सर्वेक्षण मोहीम २०२० ही मोहीम केंद्र सरकारच्या गृह निर्माण व नागरी विकास मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर राबविण्यात आली होती. यामध्ये देशातील १४३५ महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती असलेल्या १४३५ शहरांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. स्वच्छ सर्वेक्षण मोहीम २०२० अंतर्गत या कचरा मुक्त शहर या स्पर्धेचा निकाल काल केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेने आपली स्वच्छते बाबतच्या पारितोषिक मिळविण्याची परंपरा कायम राखत 3 तारांकित मानांकन मिळविले आणि  देवळाली प्रवरा शहराच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

केंद्र सरकारच्या गृह निर्माण व नागरी विकास मंत्रालया कडून दरवर्षी संपूर्ण देशभर स्वच्छ सर्वेक्षण अभियान  अंतर्गत स्वच्छते बाबतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक स्पर्धा घेतल्या जातात यामध्ये महानगरपालिका,नगरपरिषदा  व नगरपंचायती असलेले शहरे सहभागी होतात त्यामधील “कचरा मुक्त शहर” या स्पर्धेमध्ये देशातील १४३५ व महाराष्ट्रातील २४४  सहभाग शहरांनी नोंदविला त्यापैकी देशातील १४१ व महाराष्ट्रातील ७६ शहरांना मानांकन प्राप्त झाले.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेमार्फत दररोज ओला, सुका, प्लास्टिक व घातक असा वर्गीकृत कचऱ्याचे संकलन करण्यात येते. नगरपरिषदे मार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते व त्याची अल्प दरात विक्री केली जाते. तसेच सुका कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येते. शहर कचरा मुक्त होण्याकरिता शहरातील सर्व कचरा कुंड्या काढून टाकण्यात आल्या. शहरातील सार्वजनिक, व्यावसायिक, रहिवासी भागाची व नाल्यांची दररोज साफ सफाई करण्यात येते. शहर प्लास्टिक मुक्त करण्याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करून प्लास्टिक बंदी करण्यात आली. तसेच नागरिकांना कापडी पिशाव्यांचे वाटप करण्यात आले. शहरातील सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता केली जाते. त्यानुषंगाने शहरास यावर्षी ODF++ चा दर्जा प्राप्त झाला आहे.

देवळाली प्रवरा सर्व शहरवासीयांचे सहकार्य लाभल्याने व मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, माझे सर्व सहकारी पदाधिकारी व विशेष करून सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे स्वच्छ सर्वेक्षण २०२० चे काम केले असल्याने आपल्या शहरास हे “कचरा मुक्त शहर” मध्ये 3 तारांकित मानांकन प्राप्त झाले आहे, याचे श्रेय सर्व अधिकारी, कर्मचारी व माझ्या शहरवासियांस जाते. असे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.

सर्व शहरवासीय, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हे मानांकन प्राप्त झाले आहे यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो व आभार मानतो असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here