प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोरोना विषाणूच्या जीवघेण्या दहशतीमुळे कड्यात प्रवेश करणा-या प्रमुख रस्त्यांना बांबूचे कुंपण घालून पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सर्वच रस्ते अक्षरश: निर्मनुष्य झाले असून नागरिक स्वत:हून काळजी घेताना दिसत आहेत.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण परिसरात दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेले सातजण कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे जवळपासची अनेक गावे प्रशासनाकडून अनिश्चित काळासाठी लाॅकडाऊन करण्यात आली आहेत. कडा शहरातील नागरीकांनी देखील कोरोनाचा मोठा धसका घेतला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणा सतर्क झाली असून गावात ठिकठिकाणी प्रमुख रस्त्यांना बांबूंचे कुंपण घालून बंद करण्यात आले आहे. कडा गावात प्रवेश करणा-या सगळयाच रस्त्यांवर आता शुकशुकाट दिसू लागला आहे. कायम गजबजलेली कड्याची बाजारपेठ बुधवारी कोरोनाच्या दहशतीमुळे निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.