Shrigonda : एटीएममधून संक्रमणाचा धोका, निर्जंतुकीकरण होत नसल्याने कोरोनाचा प्रसार होत असल्याची भीती

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – कोरोना संकटाच्या काळात एटीएम सेंटरमध्ये निर्जंतुकीकरण केले जात नसून पैसे काढण्यासाठी आलेले नागरिकदेखील सामाजिक दुरीचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे एटीएम केंद्रांमधून कोरोनाचे संक्रमण पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

एकीकडे प्रशासन विविध माध्यमांतून सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत आहे. तोंडावर मुखपट्टया बांधाव्यात, साबणाने हात स्वच्छ धुवावे असे एक ना अनेक प्रकारे करोनाची साखळी तोडण्यासाठी सूचना देत आहेत. पण सध्या टाळेबंदीच्या काळात अनेक आर्थिक व्यवहारासाठी रोकड वापरली जात असल्याने एटीएम केंद्रांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत आहेत. या रांगांमध्ये शासकीय नियमांची पायमल्ली होत असताना दिसत आहे. आर्थिक व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात रोकडीची मागणी केली जात आहे. यामुळे नागरिकांना वारंवार पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये जावे लागत आहे. पण ही एटीएम सेंटर करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

एटीएम सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असून प्रशासनाचे याकडे कोणतेही लक्ष नाही. दररोज शेकडो नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या एटीएम सेंटरची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात नसल्याने ते करोनाचे अतिसंक्रमित ठिकाण ठरत आहेत. टाळेबंदीच्या काळात नागरिक बँकेत जाण्यापेक्षा एटीएम केंद्रामध्ये जाऊन पैसे काढणे पसंत करत आहेत. यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. बहुतांश एटीएम केंद्रामध्ये कोणतेही सुरक्षारक्षक नाहीत यामुळे रांगा लावताना कोणतीही शिस्त पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे.

या एटीएम केंद्रावर दिवसभरात शेकडो नागरिक येतात आणि पैसे काढण्यासाठी एटीएम यंत्रे हाताळतात. पण या केंद्रावर पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली जात नाही. त्यांचे शारीरिक तापमानदेखील तपासले जात नाही.निर्जंतुकीकरणाची कुठलीच सुविधाच ठेवण्यात आली नसल्याने हात स्वच्छ न करताच लोक मशीन हाताळत आहेत. तसेच, एटीएम केंद्र हे वातानुकूलित असतात यामुळे येथे पैसे काढणाऱ्या लोकांपैकी एखादा व्यक्ती जरी करोना सकारात्मक निघाला तर या विषाणूचा प्रसार किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

काही बँकेच्या शाखेच्या बाजूला असलेल्या एटीएम केंद्राच्या बाहेर सॅनिटायझर ठेवले आहेत, पण इतर ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. तसेच सेंटर स्वच्छ अथवा निर्जंतुक केले जात नाहीत. यामुळे नागरिकांना करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
– सूज्ञ नागरिक

आम्ही आमच्या बँकेच्या सर्व एटीएम केंद्रामध्ये सॅनिटायझर ठेवले आहेत, पण तरीही लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पैसे काढताना आणि रांगेत उभे राहताना सावधानता बाळगावी. सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करावे. मशीनचा वापर झाल्यावर हात सॅनिटायझर करावे.
– व्यवस्थापक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here