Shrigonda : आमदार पाचपुतेंनी सरकारवर टीका करण्या अगोदर स्वतः आत्मपरीक्षण करावं – घनःशाम शेलार

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हैराण झाले असताना काल आमदार बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून जनतेला वा-यावर सोडले आहे, अशी टीका केली. ही टीका निरर्थक असून अशी टीका करण्या अगोदर या अत्यंत अडचणीच्या कालखंडात आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केलं याच आत्मपरीक्षण करावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हैराण झाले असून विकसित देश देखील या भयंकर संकटाने हतबल झाले आहेत. ही कठीण परिस्थिती राज्यातील उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वातील सरकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम पूर्वक हाताळत असून देशाचे नेते शरद पवार हे या वयात या अडचणीतून राज्याला व देशाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात साहेब, गृहमंत्री अनिल देशमुख व सर्वच मंत्री अहोरात्र या भयंकर संकटावर मात करण्यासाठी कष्ट घेत आहेत.
हे राज्यातील जनता पाहत असून सरकारचे जनतेकडून वेळोवेळी कौतुकही झाले आहे. तर उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी देखील महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे. एवढं चांगले काम सरकार करत असताना आमदार पाचपुते सरकारवर टीका करत आहेत, खरतर ही वेळ राजकारण करण्याची नसून या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असताना यांना मात्र राजकारण सूचतंय, खरंतर तुम्ही केवळ शिवसैनिकांच्या मतांमुळे आमदार झालात त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही.
या अडचणीच्या कालखंडात जनतेला मदत व्हावी म्हणून अनेकजण पुढे येऊन काम करत आहेत. जिल्ह्यातील  पहिल्यांदाच निवडून आलेले सर्वच आमदार कोरोना पार्श्वभूमीवर जनतेला मदत करण्यासाठी खूप चांगलं काम करत आहेत. आमदार रोहित पवार, व आमदार आशुतोष काळे, तसेच शेजारचे आमदार अशोक पवार यांनी त्यांचे कारखान्यांचे वतीने सॅनिटायझर तयार करून त्याचे मोठ्या प्रमाणात जनतेला वाटप केले आहे. आपण मात्र आपल्या साईकृपा  कारखान्याचे स्पीरिट कुठे आणि कशासाठी पाठविले हे जग जाहीर आहे. हेच का तुमच योगदान ? असा सवाल करून स्वतःच ठेवायचं झाकून दुस-याच बघायचं वाकून ही तुमची कायमचीच सवय आहे, असा हल्ला चढवला तसेच यापुढे जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग बंद करा व सरकारवर टीका करण्या अगोदर आमदार पाचपुते यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे, मगच बोलावे असा इशारा शेलार यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here