Karjat : ‘न्याय योजनेचा’ एका दिवसाचा लाभ लाभार्थींना वाटप

माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिम्मित न्याय योजनेचा एका दिवसाचा लाभ देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि युवक काँग्रेसचे नेते नगरसेवक सचिन घुले  (छाया : डॉ अफरोजखान पठाण, कर्जत)

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिम्मित युवक काँग्रेसचा उपक्रम

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २१

कर्जत : कर्जत युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक सचिन घुले यांनी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निम्मित कर्जत येथील आर्थिक दुर्लभ घटकातील तब्बल १११ कुटुंबांना लोकसभा जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे न्याय योजनेचा एक दिवसाचा दोनशे रुपयांचा लाभ गुरूवारी देण्यात आला. तसेच वरील योजना केंद्र सरकारने राबवावी, अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत “न्याय योजनेचे” आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. ज्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न एक लाख चव्वेचाळीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबाना काँग्रेस सरकारकडून दरमहा ६ हजार रुपये म्हणजेच दोनशे रुपये प्रतिदिन थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे सदर रक्कम महिलेच्या खात्यात जमा करण्याचा हेतू होता. जेणेकरून या पैशाचा दुरूपयोग होणार नाही. मात्र, दुर्दैवाने केंद्रात काँग्रेसचे सरकार न आल्याने या योजनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
या न्याय योजनेद्वारे गरजवंत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूवर खर्च करता येईल याचा अप्रत्यक्षरित्या फायदा वस्तूची मागणी वाढून त्याचा लाभ उत्पादन वाढीवर होणार होता. यासह या क्षेत्रात कामगारांची संख्या वाढली असता रोजगाराच्या जास्त संधी निर्माण होत देशाच्या अर्थ व्यवस्थेला गती मिळाली असती. मात्र, तसे घडले नाही. सध्या कोरोना संकटामध्ये संपूर्ण देश होरपळून निघाला असताना आरोग्य आणि अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करीत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र शासनाकडे न्याय योजना सुरू करण्यासाठी मागणी करीत आहे. जेणेकरून भविष्यात गरजवंत कुटुंबाना या सहा हजार रुपयांचा फायदा आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी उपयोगी पडेल. आणि अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल. त्यामुळे गुरुवार दि २१ मे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिम्मित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्र सरकारकडे पुढील सहा महिन्यासाठी न्याय योजनेसारखी दरमहा सहा हजार रुपयांची योजना सुरू करत गरजू लोकांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

या अनुषंगाने आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, कर्जत युवक काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक सचिन घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी न्याय योजनेचा एका दिवसाचा दोनशे रुपयांचा लाभ कर्जतमधील १११ कुटुंबाना स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिम्मित घरपोच दिला. यावेळी शहरध्यक्ष अमोल भगत, सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे, अड संग्राम ढेरे, माजीद पठाण, इमरान पठाण, उमेश गलांडे, शुभम माने, नगरसेविका मोनाली तोटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here