Shevgaon : मुहुर्ताच्या तारीख पे तारीखला कंटाळल्यानंतर अखेर वृक्षाखाली ‘शुभमंगल सावधान’

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव – लग्न ठरले, मुहूर्त निघाला, घटिका समीप आली असताना ठरलेल्या मुहूर्तावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. पुन्हा लग्नाची तीथं काढली, पण लॉकडाऊन वाढला. पेचात पडलेल्या वधू, वराच्या घरच्यांनी लॉकडाऊन उठण्याची वाट पाहात बसण्यापेक्षा चार,चौघात बार उडवण्याचा निर्णय घेतला.

शेवगाव तालुक्यातील कांबी गावात शेतातील झाडाच्या सावलीत शुभविवाह सोहळा पार पडला. अन् शेवगावचे बाप्पासाहेब मरकड, कांबीचे उद्धव जाधव हे दोन परिवार रेशीमगाठी बांधत ऋणानुबंधात अडकले गेले. जवळपास आठ महिन्यापूर्वी मुलगा मुलीला पाहायला आला, मुलगी पसंत पडताच पसंतीचा भाग उरकला. लग्नाची तारीख ठरली अन् कोरोनाने देशात शिरकाव करताच संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. लॉक डाऊन संपेल या आशेने झालेल्या बैठकीत पुनः ८ मे तारीख निश्चित करण्यात आली. पण पुनः तीच परिस्थिती कायम राहिल्याने, ‘तारीख पे तारीख’  काढण्याच्या फंद्यात न पडता, चार चौघात मुलीच्या घरी ब्रम्हवृंदाच्या साक्षीने चि.अजय, चि.सौ.का. कावेरीचा शुभविवाह अतिशय सध्या पद्धतीने झाडाच्या मंडपाखाली पार पडला.

शासनाने लॉकडाऊन दरम्यान घालून दिलेले नियम,अटी,शर्ती पाळत हा विवाह सोहळा उरकला. यावेळी सर्वांनी एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवून अजय, कावेरीच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या. सात मंगलाष्टके, सात फेरे घेत दोघांच्या कौटुंबिक जीवनाला सुरुवात झाली. लग्नाचा खर्च वाचला म्हणून वर पिता बप्पासाहेब रंगनाथ मरकड यांनी गरजूंना किराणा वाटप करण्याचा निर्णय जाहीर करुन सामाजिक जाणीव दाखवून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here