Shevgaon : ‘लॉकडाऊनची किमया न्यारी – गावी निघालेल्या तरुणाची स्वारी, अर्धांगिनीस घेऊनि पोहोचली दारी’ 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – पुण्यात बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत असलेला मारवाडी समाजातील तरुण देशव्यापी लॉकडाऊनमुळे नागपूर जिल्ह्यातील आदीवासी पट्टयात तालुक्याचे ठिकाण असलेल्या आपल्या उमरेड गावी जाण्यास निघाला. परंतू, तब्बल आठ जिल्ह्यांच्या सीमा व सुमारे आठशे किमी. अंतर पार करुन जाताना शेवगाव येथे थांबून आपल्या नियोजित वधूशी लग्नाची गाठ बांधून तो पत्नीसह घरी पोहोचला.

माहेश्वरी समाजातील या उच्चशिक्षीत अभियंता नवदाम्पत्याने सर्व धार्मिक रितीरिवाजांसह वधुपित्याच्या अंगणात साधेपणाने घेतलेल्या सप्तपदीने अशा विधायक उपक्रमांची गरज तर अधोरेखित केलीच, त्याचबरोबर ‘लॉकडाऊनची किमया न्यारी – गावी निघालेल्या तरुणाची स्वारी, अर्धांगीणीस घेवूनि पोहोचली दारी’ अशी उक्तीही सार्थ ठरविली.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील विठ्ठलदास भट्टड यांचा मुलगा स्वप्नील पुणे येथे नोकरी करतो. गेल्या डिसेंबर महिन्यात त्याचा विवाह शेवगाव तालुक्यातील राणेगावचे ग्रामसेवक राजेंद्र लड्डा यांची बंगळुरू येथे बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीस असलेली कन्या प्रियंका हिच्याशी निश्चित झाला. मे महिन्यात विवाहाची तारीखही ठरली. परंतु, कोरोना संकटामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली.

मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी प्रियंका लड्डा ही शेवगावी तर, स्वप्नील भट्टड पुण्यात अडकून पडले. दोघांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु होते. वैतागून स्वप्नीलने उमरेडला जाण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. परंतू, नागपूर व पुणे असे दोन्ही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने त्यास यश येईना. अखेर नातेवाईकांच्या आधारे टप्प्याटप्प्याने प्रवास करुन गाव गाठण्याच्या इराद्याने तो पुण्याहून प्रथम आपल्या भावी वधुच्या घरी शेवगावला आला. त्याचवेळी राज्यात लॉकडाऊनचे पाश आणखी घट्ट आवळले गेल्याने त्यास मग शेवगावीच थांबणे भाग पडले.

दरम्यान, शेवगाव तालुका माहेश्वरी सभा, माहेश्वरी युवक मंडळ व महिला मंडळाच्या काही पदाधिकारी, सदस्यांनी स्वप्नील व प्रियंकाचा विवाह शेवगाव येथेच साध्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रस्ताव दोन्ही कडच्या लोकांपुढे मांडून पुढाकार घेतला. तातडीने मुलाचे आई, वडील, मामा व चुलते असे चौघेजण आदल्या दिवशी शेवगावात दाखल झाले. पुरोहितासह संबंधितांची कोविड १९ तपासणी तसेच मास्क, सॅनेटायझर व सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधींसह प्रियंका व स्वप्नीलच्या लग्नाची गाठ बांधली गेली व त्यानंतर नवदाम्पत्य उमरेडला रवाना झाले.

लॉकडाऊन काळात राज्यात अनेक विवाह समारंभ पार पडत आहेत. यातील बहुतेक प्रकारांत दोन्ही पक्षाकडील मंडळी एकाच जिल्ह्यातील वा फारतर एखाद दुसऱ्या जिल्ह्याची सीमा ओलांडून आलेली. परंतु, येथे तब्बल आठशे किमी.चे अंतर व आठ जिल्ह्यांच्या सीमा पार करुन वधुपित्याच्या दारात सप्तपदीने विशेषत: मारवाडी समाजात साधेपणाने संपन्न झालेला असा दूर्मिळ समारंभ सर्वांनाच प्रेरणादायी ठरावा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here